Breaking News

सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत संविधान बचाव आंदोलन थांबणार नाही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा सरकारला इशारा

औरंगाबाद : प्रतिनिधी
या सरकारचा संविधानाला विरोध आहे…धर्मनिरपेक्ष शब्दाला विरोध आहे… धर्मनिरपेक्ष शब्द टोचतो का ? ७० वर्ष हा वाद झाला नाही मग आत्ताच का ? जी मनुस्मृती सर्व जातीतील लोकांना नीच मानते,भेदभाव करते अशा मनुस्मृतीला जपण्याचे काम भाजप करत आहे म्हणून संविधान वाचवण्यासाठी राष्ट्रवादीने हे आंदोलन सुरु केले आहे आणि हे सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला दिला.
औरंगाबादमध्ये संविधान बचाव देश बचाव मोहिमेच्या आंदोलनामध्ये मार्गदर्शन करताना अजितदादा पवार यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. संभाजी भिडे संतांपेक्षा मनु श्रेष्ठ आहे असे सांगत आहेत. असं म्हणण्याचं धाडस होतं तरी कसं ? भेदभाव जपणाऱ्या मनुस्मृतीला जपण्यासाठी पुढाकार का घेतला जात आहे असा संतप्त सवालही दादांनी केला.
संविधान बचाव देश बचाव ही मोहीम आजच्या दिवसाला काळाची गरज होवून बसली असून संविधानाबाबत सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे असा आरोपही अजितदादा यांनी केला.
अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक विषयांना हात घातला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली. मात्र ही मागणी सरकार मान्य करत नाही. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळायला हवी अशी मागणीही केली.
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे दुष्काळ का जाहीर करत नाही, मुख्यमंत्र्यांना आणखी किती आत्महत्या हव्या आहेत असा संतप्त सवालही अजितदादांनी केला.
मराठवाड्यात भारनियमनाचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. आघाडी सरकार असताना पवार साहेबांच्या वाढदिवशी १२-१२-१२ रोजी राज्य भारनियमनमुक्त करू असा निर्धार आम्ही केला होता. राज्य आम्ही भारनियमनमुक्त केले. मात्र आत्ताचे सरकार तसं करताना दिसत नाही. यांना कोळसा आणता येत नाही का ? हे काय झोपा काढण्यासाठी आहेत का ? असे अनेक सवाल सरकारला दादांनी केले.
मराठवाडा हे नारीशक्तीचे शक्तीपीठ आहे. मात्र इथेच महिलांवर जास्त अन्याय अत्याचार होत आहे. प्रत्येक दिवशी महिल़ाची हत्या, महिलांवरील अत्याचार अशा बातम्या वाचायला मिळतात. सरकारने ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. जेणेकरून कुणालाही महिलेकडे डोळे वर करून पाहण्याची हिम्मत करता येणार नाही. कायदा कडक करायला हवा त्यासाठी आम्ही सरकारला सहकार्य करू असे आश्वासन अजितदादांनी सरकारला दिले.
भाजपचे पदाधिकारी असलेले मधु चव्हाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. राम कदम यांनी मुलींना उचलून आणण्याची भाषा केली. राम कदम यांनी एकाही मुलीला हात लावावा… होत्याचं नव्हते करेन असा सज्जड दम भरतानाच सत्तेची नशा चढली आहे का ? फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात अशी भाषा कोणी वापरली नव्हती. आपण जागृत झाले पाहिजे असे आवाहनही दादांनी केले.
मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी जसा लढा उभारला गेला होता तसा लढा उभारण्याची सध्याच्या घडीला गरज आहे. ज्यांना काहीच कळत नाही अशा लोकांच्या हातात कारभार आहे. सरकारतर्फे लोकांना फसवण्याचे काम केले जात आहे. सरकारवर पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज झालं आहे. यांना कारभार सांभाळता येत नाही म्हणून यांना बाजूला करणे गरजेचे आहे असेही दादा म्हणाले.

देशाच्या संविधानावर घाला घातला जातोय – धनंजय मुंडे
२०१४ ला सत्तांतर झाले… मोदी पंतप्रधान झाले… जनतेने परिवर्तन घडवले… डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देश आजपर्यंत नीट चालला होता. मात्र आज देशाच्या संविधानावर घाला घातला जात आहे असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संविधान बचाव देश बचाव कार्यक्रमात केला.
संविधान बचाव देश बचाव कार्यक्रमात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारविरोधात जोरदार बॅटींग केली.
ज्या संविधानामुळे तुम्ही-आम्ही पाहिजे ते करू शकतो. हे स्वातंत्र्य आपल्याला १९५० साली मिळाले परंतु ७० वर्षात संविधान वाचवण्याची भाषा झाली नव्हती. मात्र आजच्या राज्यकर्त्यांमुळे संविधान वाचवा असं म्हणण्याची वेळ आली आहे. या सरकारने पहिला हल्ला तुमच्या चुलीवर केला. मांसाहार आणि शाकाहार अशी विभागणी या सरकारने केली. विचारवंतांची हत्या झाल्या. ही हत्या संविधानाची हत्या होती असेही धनंजय मुंडे म्हणाले.
देशात विकास २०२० ते २०२२ दरम्यान होईल असे भाजपवाले म्हणतात, २०-२२ ला राज्यसभेत यांचं बहुमत होईल असं यांना वाटत आहे. जर असं झालं तर संविधान बदलले जाईल हा आरएसएसचा हिडन अजेंडा आहे असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.

देशाच्या संविधानाला धक्का लागू देणार नाही – खासदार सुप्रिया सुळे
देशाचे संविधान आम्ही कुणालाही बदलू देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस तसे कधीही होवू देणार नाही. आदरणीय शरद पवारसाहेब, विधिमंडळ पक्षनेते अजित दादा, आम्ही सगळे आजपर्यंत केवळ संविधानावरच हात ठेवून पदाची शपथ घेतो त्यामुळे या संविधानाला धक्का लागू देणार नाही असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
राज्यातील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत. सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार, वा मंत्री कुणीही महिला-मुलींबाबत अपमानास्पद बोलतील तर सुप्रिया सुळे कदापीही सहन करणार नाही अशी स्पष्ट भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली.
आज देशात महागाई प्रचंड वाढली आहे, सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. म्हणूनच आज जनता म्हणत आहे की, “महंगाई पोहोची हद्द के पार, नको रे बाबा मोदी सरकार”, असे वक्तव्य राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी केले.
जनता राज्यातील प्रश्नांना कंटाळली असताना सत्ताधारी मात्र खोटा प्रचार करत आहेत. सरकार हम करे सो कायदा अशा पद्धतीने काम करत आहे. आपल्या संविधानाचा पायाच ढासळण्याची भीती आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस याविरोधात मोठे आंदोलन उभारेल असा इशाराही फौजिया खान यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या की, भारतीय संविधानाला अनेक वेळा परीक्षा द्यावी लागली आहे. ज्या संविधानाने आपल्याला जगण्याचा अधिकार दिला त्या संविधानाला जाळण्याचा प्रयत्न देशात कधी नव्हे तो घडला. संविधानिक मूल्यांची रोज पायमल्ली होत आहे. राज्यात अल्पसंख्याक समाजातील लोकांवर अत्याचार होत आहेत. दलितांवरील अत्याचार वाढत आहेत, महिलांवर अत्याचार काही कमी होत नाहीत. हे सर्व होत असताना सरकार मात्र गप्प राहून याला मूकसमर्थन देत आहे असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.
राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे ‘संविधान बचाव, देश बचाव’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. संविधानिक तत्त्वांची मशाल घेवून आज औरंगाबादमध्ये देशातील वाढत्या मनुवादी विचारसरणीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. यावेळी प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
या संविधान बचाव,देश बचाव कार्यक्रमाला विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार राजेश टोपे, आमदार प्रकाश गजभिये, शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षक आमदार सतिष चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर आदींसह महिला पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *