Breaking News

श्रीमंत शाहु महाराजांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा पलटवार, असा अपमान बरा नव्हे फडणवीसांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

संभाजी राजे यांच्या उमेदवारी नाट्यावर श्रीमंत शाहु महाराजांनी शिवसेनेची पाठराखण करत राज्यसभा निवडणूक लढवणे हा संभाजीराजेंचा व्यक्तिगत निर्णय होता. त्यात छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा मुद्दा येत नाही अशी भूमिका मांडली. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी शाहु महाराजांच्या न्यु पॅलेस येथील निवासस्थानी जात श्रीमंत शाहु महाराजांची भेट घेवून चर्चा केली. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधत किडक्या डोक्याच्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट दिल्याचा आरोप केला. त्यास राऊत यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले.

संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी ते शाहू महाराजांच्या भेटीसाठी ते न्यू पॅलेसमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत संभाजीराजेंच्या जागी उमेदवारी मिळालेले संजय पवारदेखील उपस्थित होते. या भेटीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आणि शाहू महाराजांमध्ये फोनवर चर्चा झाली असून कोल्हापूरला आपण भेटीला येऊ असं आश्वासन त्यांनी दिल्याचं सांगितले.

मी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो. मी बऱ्याच वर्षांनी आज कोल्हापुरात आलो. उद्धव ठाकरेंनी सकाळी मला फोन करुन कोल्हापुरात आहात तर महाराजांचे आशीर्वाद घ्या आणि मलाही त्यांच्याशी बोलायचं आहे असं सांगितले. ठाकरे कुटुंब आणि महाराजांचं एक नातं आहे. याठिकाणी उद्धव ठाकरे, बाळासाहेब आले होते. उद्धव ठाकरेंनी महाराजांना फोनवर मी स्वत: कोल्हापुरात येईन असं सांगितलं आहे. महाराष्ट्रातील आमच्या सामाजिक कार्यात आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद राहू देत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचे राऊत यांनी सांगितले.

आम्ही इथे एका आत्मीयतेने आलो आहोत. वयाने आम्ही त्यांच्यापेक्षा फार लहान आहोत. पण या घराण्याविषयी, कुटुंबाविषयी, शाहू महाराजांविषयी प्रबोधनकारांपासून एक नातं आहे, त्या नात्यानं आम्ही इथे येतो. याच्यात कोणतंही राजकारण नाही एवढंच सांगतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

भेटीनंतर बाहेर आल्यानंतर संजय राऊतांना फडणीवसांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? छत्रपती आहेत ते..छत्रपतींचा असा अपमान करु नका. चुकीच्या माहितीवर ते बोलणार नाहीत, ते फार ज्येष्ठ आहेत. ज्या घराण्याचा वारसा पुढे घेऊन ते चालले आहेत तिथे चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्यं केली जात नाहीत.

Check Also

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *