Breaking News

उध्दव ठाकरेंनी दिले शिंदे गटाला आव्हान,.. मैदानात उतरा, कोण जिंकतो ते बघुया आयोगाच्या निर्णयानंतर सलग दुसऱ्या दिवशी शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर केली गर्दी

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला. आज दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले. त्यावेळी मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने जमा झालेल्या शिवसैनिकांशी उध्दव ठाकरे यांनी कारमध्ये उभे राहून संवाद साधताना शिंदे गटाला थेट आव्हान दिले. मर्द असाल तर चोरलेला धनुष्यबाण निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरा. मी मशाल घेऊन येतो. कोण जिंकतो ते बघुया, असे खुले आव्हान दिले.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, ज्या पद्धतीने आपले शिवसेना हे नाव चोराला दिले. आपला पवित्र धनुष्यबाण हा चोराला दिला. ज्यांनी धनुष्यबाण चोरला ते मर्द असतील तर त्यांनी चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत यावं. मी मशाल घेऊन तुमच्यासमोर उभा राहतो. बघुया काय होतं तर. धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो. रावणाने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो उताणा पडला होता. तसेच हे चोर आणि चोरबाजाराचे मालक शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत, अशी खोचक टीकाही केली.

निवडणूक आयोगाच्या निकालावरून उध्दव ठाकरे म्हणाले, मी कुठेही खचलो नाही. कुठेही खचणार नाही. माझी ताकद तुम्ही आहात. तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. ही ताकद जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत असे कितीजरी चोर आणि चोरबाजाराचे मालक आले तरी त्यांना गाडून त्यांच्या छातीवर शिवरायांचा भगवा फडकवण्याची ताकद आमच्या मनगटात आहे, असल्याचा निर्धारही व्यक्त केला.

शिवसेना हे नाव चोरांना देण्यात आलं. आपला पवित्र धनुष्यबाण चोरांना देण्यात आला. ज्या कपट कारस्थानाने हे राजकारण करत आहेत त्यावरून हे आपलं मशाल हे निशाणही काढून घेऊ शकतात. मात्र, माझं आवाहन आहे की, ज्यांनी धनुष्यबाण चोरले ते मर्द असतील तर त्यांनी चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत या, मी मशाल घेऊन तुमच्यासमोर येतो. पाहू कोण जिंकतं ते. कारण धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो असे आव्हानही त्यांनी शिंदे गटाला आणि भाजपाला दिले.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, धनुष्यबाण कोणाचा हे जनतेला ठरवू द्या. शिवसेना कोणाची हे कोणालाही विचारा. यांचा एक डाव सुरू आहे. त्यांना ठाकरे नाव हवं आहे, बाळासाहेबांचा चेहरा हवा आहे. मात्र, शिवसेनेचं कुटुंब नको आहे. आमच्यावर मोदींचं नाव सांगून आरोप करत होते. तेव्हा आमची युती होती. तेव्हा लोक मोदींचा मुखवटा घालून सभेला यायचे, आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागत आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता मुर्ख नाही. मुखवटा कोणता आणि खरा चेहरा कोणता हे जनतेला माहिती आहे अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *