Breaking News

महाराजांच्या लढाईच्या किस्स्यातून उध्दव ठाकरे यांनी सांगितले भास्कर जाधव यांच्या बढतीचे कारण अरविंद सावंत, भास्कर जाधव यांना नेते पदावर बढती

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदारांचा एक मोठा गट फुटून बाहेर पडला. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. एकीकडे शिंदे गट आणि भाजपाचं सरकार सत्तेत आल्यामुळे शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना दुसरीकडे बंडखोरीमुळे पक्षाला बसलेल्या धक्क्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘ट्रबल शूटिंग’ मोडवर आल्याचं दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे शिवसेना भवनात राज्यभरातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेताना दिसत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका सूचक विधानाची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली. पक्षातून नेतेपदी असणारी अनेक ज्येष्ठ मंडळी शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नव्याने काही नियुक्त्या केल्या. यामध्ये अरविंद सावंत यांना शिवसेना नेतेपदी बढती देण्यात आली. मात्र, त्यांच्यासोबतच भास्कर जाधव यांना देखील शिवसेना नेतेपद दिल्यावरून टीका-टिप्पणी सुरू झाली होती. मात्र, त्यासंदर्भात बोलताना आता उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना नेतेपदी बढती दिल्याचाही उल्लेख केला.

उध्दव ठाकरे म्हणाले, तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय, की गणेशोत्सवाच्या दिवसांतही तुम्ही आलात. भास्कर जाधव, तुम्हालाही शुभेच्छा देतो. तुमच्याकडून माझ्यासह तमाम शिवसैनिकांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या तुम्ही पूर्ण कराल, अशी मला खात्री आहे. मी आता हळूहळू टीम वाढवतोय. अरविंद सावंत आणि भास्कर जाधवांना आपण नेते केलं आहे. आणखीन नेत्यांचीच नाही, पण सगळ्यांचीच टीम सावकाशपणे मी वाढवणार आहे असल्याचे स्पष्ट केले.
भास्कर जाधवांना विचारपूर्वक नेतेपद दिलं आहे. कारण आता आपल्याला लढायचं आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी यावेळी सूचक विधान केले. त्यामुळे आगामी काळात भास्कर जाधव शिवसेनेकडून अधिक आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बाबासाहेब पुरंदरेंनी एक गोष्ट सांगितली होती. साल्हेरचा किल्ला शिवाजी महाराजांनी जेव्हा जिंकला, तेव्हा मराठ्यांचं सैन्य जेमतेम होतं आणि मोगलांचं सैन्य लाखात होतं. तरीही महाराज जिंकले. कारण त्यांच्यासोबत मूठभर का होईना, निष्ठावंत होते. तेव्हा पसाभर असूनही निष्ठावंतांनी मोगलांना पाणी पाजलं. त्यामुळे मला निष्ठावंत हवेत. ते तुम्ही दिसता आहात. मला समाधान हे आहे की आत्ता माझ्यासोबत असणारे कट्टर, कडवट, निष्ठावान शिवसैनिक आहेत. आणि हेच आपल्या शिवसेनेचं वैभव असल्याचे ते म्हणाले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *