Breaking News

निवडणूकीतून माघार घे म्हणून मोदींचा फोन, पण बंडखोर ठाम

काही दिवसांपूर्वी हिमालच प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर झाल्या. त्यानंतर भाजपाने विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराला सुरुवातही केली. परंतु भाजपाला सध्या येथे मोठ्या प्रमाणावर बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर बंडखोर उमेदवार कृपाल परमार यांनी माघार घेण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याचा दावा केला. त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. मात्र मोदींच्या फोन नंतरही परमार यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने हिमाचल प्रदेशमध्ये सध्या याचीच चर्चा सुरु आहे.

भाजपाचे माजी खासदार परमार यांनी फतेहपूर येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. ६३ वर्षीय परमार हे गेल्या एका वर्षापासून पक्षावर नाराज आहेत. पोटनिवडणुकीत आपल्याला उमेदवारी न दिल्याने त्यांनी नाराजी जाहीर केली होती. त्यांनी आपल्या बंडखोरीसाठी भाजपाध्यक्ष आणि आपले जुने वर्गमित्र जे पी नड्डा यांना जबाबदार धरलं आहे.

नड्डा यांनी १५ वर्षं माझा अपमान केला, असं परमार यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं. कथित फोन कॉलमध्ये ते पंतप्रधांनाही हे सांगत आहेत. मात्र या फोन कॉलची बाकी भाजपा किंवा पंतप्रधान कार्यालयाने पुष्टी केलेली नाही.

मी निवडणूक लढणार आहे, पण भाजपा उमेदवार म्हणून नाही. ही माझ्यातील आणि काँग्रेस उमेदवारातील लढाई आहे, असेही त्यांनी यावेळी जाहिर केले.

दरम्यान, या कथित फोन कॉलमध्ये परमार मोदींकडे नड्डा यांनी गेली अनेक वर्षं आपल्याला बाजूला केल्याचा आरोप केला आहे. मोदीजी, नड्डांनी १५ वर्ष माझा अपमान केला, असं ते या फोन कॉलमध्ये सांगत आहेत. यावेळी परमार यांनी आपण या फोन कॉलला कमी लेखत नसून, देवाचा संदेश असल्याचं म्हटलं आहे.

एनडीटीव्हीशी बोलताना, परमार यांनी हा खोटा कॉल नव्हता असा दावा केला आहे. ३० ऑक्टोबरला मोदींनी स्वत: आपल्याला फोन केल्याचं सांगत आम्ही गेल्या २५ वर्षांपासून एकमेकाला ओळखतो. जेव्हा ते (मोदी) हिमाचल प्रदेशचे प्रभारी होते तेव्हा मी उपाध्यक्ष होतो. आम्ही एकत्र भरपूर प्रवास केला असून, एकत्र राहिलोही आहोत. माझे त्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध आहेत. मी त्यांना देव मानतो, असेही त्यांनी सांगितले.

मी अद्यापही निवडणुकीच्या रिंगणात आहे. जर तुम्ही एक सेकंद आधी जरी फोन केला असता तर मी उमेदवारी अर्ज मागे घेतला असता. पण मला आताच माहिती मिळाल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना इतक्या उशिरा सांगणं हादेखील कटाचा भाग असू शकतो. २०१७ मध्ये नेमकं काय झालं याची मला कल्पना नाही. कोणीही मला काय झालं याबद्दल सांगितलं नाही. त्यांनी मला उमेदवारी देणं बंद केलं. पक्षातील लोक माझी खिल्ली उडवू लागले होते, असे त्यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशातील ६८ जागांसाठी निवडणूक होत असून यामधील ३० जागांवर भाजपाला बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. ८ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *