Breaking News

पिंपरी-चिंचवड उमेदवारीवरून अजित पवार म्हणाले, बोलणं झालं उध्दव ठाकरेंचा आघाडीला पाठिंबा ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांनी शांत रहावं यासाठी प्रयत्न

पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतली. सुरुवातीला या जागेसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेने माघार घेतली. मात्र ठाकरे गटाचे संभावित उमेदवार राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले, रात्री उशीरापर्यंत उमेदवारीसंदर्भात तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र एकमत झाले नाही. पण आमच्याकडे ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांनी शांत रहावं म्हणून प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड जागेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेनेचे संभावित उमेदवार राहुल कलाटे यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, दोन जागा होत्या त्यापैकी कसबा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीने काँग्रेसला दिली. तर आज आम्ही सर्वांनी नाना काटे यांचा अर्ज दाखल केलेला आहे. उद्या अर्ज छाणणी आहे, त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. काल रात्री उशीरापर्यंत आम्ही या ठिकाणी उमेदवारीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत होतो. परंतु दुर्दैवाने यावर एकमत झालं नाही. मग सकाळी मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. माझं बाळासाहेब थोरातांशीही बोलणं झालं आणि त्यांना आज आम्ही नाना काटे यांचा अर्ज दाखल करत असल्याचे मी सांगितले. आमच्याकडे ज्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यांनी शांत रहावं म्हणून आम्ही प्रयत्न सुरू ठेवणार आहोत, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो. राहुल कलाटेंना भेटायलाही काहीजण गेले होते. परंतु त्यांची काय चर्चा झाली हे मला अद्याप समजले नाही.

तसेच अजित पवार म्हणाले, याचबरोबर, पंढरपूरची निवडणूकही लढली गेली, कोल्हापूरची निवडणूकही लढली गेली. देगलूरची निवडणूकही लढली गेली. फक्त अपवाद आहे तो मुंबईचा आणि मुंबईची जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये मात्र आवाहन केल्यानंतर प्रमुख पक्षांनी तिथं उमेदवारी दिली नाही. आम्ही आणि शिवसेना, काँग्रेस सर्वांशी चर्चा करत होतो, त्यावेळी असं सर्वांचं मत आलं की ही निवडणूक लढवावी, त्यामुळे आम्ही अर्ज दाखल केलेला आहे असंही स्पष्ट केले.
राहुल कलाटेंना सांगण्याचं आम्ही काम करू, ऐकायचं नाही ऐकायचं हा त्याचा निर्णय आहे. मला मात्र उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, आपला महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे यांना शिवसेनेचा स्पष्ट पाठिंबा राहील.

एक नक्कीच सांगेन हलक्यात घेतली तर निवडणूक सोपी नाही. परंतु कष्ट घेतले तर निवडणूक अवघडही नाही. या शहराचा अनेक वर्षांपासून संबंध आहे. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच पिंपरी-चिंचवडमधून झाली असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *