Breaking News

राज्यातील साडेचार लाख विद्यार्थ्यांची ईबीसी सवलतीची निम्मी फी भरली ६५० कोटीची रक्कम जमा केल्याची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ईबीसी सवलत योजनेची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये केल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले आहे. या योजनेनुसार गेल्या वर्षी राज्य शासनाने राज्यातील ४ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांची निम्मी म्हणजे ५६० कोटीची फी भरल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केली.
सम्राटनगर प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आज सम्राटनगर येथील सभागृहात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगरसेविका जयश्री जाधव, उद्योगपती चंद्रकांत जाधव, संभाजी जाधव, निवृत्त पोलीस उप अधीक्षक सतीश माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुला-मुलींच्या शिक्षणावर अधिक भर देण्याची भुमिका राज्य शासनाने स्वीकारली असल्याचे सांगत मुलींना १२ वी पर्यंतचं शिक्षण मोफत देण्याबरोबरच त्यांना १२ वीपर्यंत एस.टी.पासही मोफत दिला आहे. त्यामुळे आता मुलींना शिक्षण घेणे अधिक सोईचे झाले आहे. याबरोबरच राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना कार्यान्वित केली तसेच ईबीसी सवलत योजनेची उत्पन्न मर्यादा १ लाखावरुन थेट ८ लाख करण्याच्या क्रांतीकारी निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.
गोरगरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय तसेच अभियांत्रिकेचे शिक्षण घेणे आता सोईचे झाले आहे. याबरोबरच परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्या युपीएसचे शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठीही सुविधा दिल्या आहेत. दिवसें दिवस सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढत असून या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी खंबिरपणे उभा रहावा यासाठी शासनाने विविध शैक्षणिक सुविधा आणि सवलती दिल्याचे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शिक्षणाबरोबर कौशल्य प्रशिक्षणावरही शासनाने अधिक भर देवून विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच एनसीसी, एनएसएस तसेच स्पोर्टसमध्ये सहभागी होवून सार्वजनिक कामात सक्रिय होणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्यातील एकही मुलगी पैसे नाहीत म्हणून शिक्षण आणि खेळापासून वंचित राहणार नाही यासाठी आवश्यक उपाय योजनांना प्राधान्य दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गरीब आणि गरजू मुलींना आर्थिक मदत करुन त्यांना शिक्षणाची दारे खुली करण्यावर भर दिला आहे. क्रिडा क्षेत्रातही भरीव कामगिरी मुलींकडून व्हावी यासाठी खेळाडू मुलींनाही आवश्यक असणारी सर्व ती मदत केली जात आहे. आज जिल्ह्यातील ६२ खेळाडू मुलींना आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचेही ते म्हणाले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *