Breaking News

अंबादास दानवे यांचा आरोप, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेला सरकार जबाबदार खाजगी संस्थेने आयोजित केला होता का?

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातेही जबाबदार आहे. तसेच या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केला.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, सदर घटनेमध्ये दुखापत झालेल्या रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते म्हणून त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार त्या हॉस्पिटलमध्ये होते, अशी माहिती देत आहेत. परंतु ते कुठेही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नव्हते. मी स्वतः तिथे जाऊन ही माहिती घेतली असल्याचे म्हणाले.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांबरोबर गृहमंत्र्यांनी सुद्धा या घटनेवर प्रतिक्रिया दिली पाहिजे होती. या दुर्घटनेच्या संदर्भात गठीत समितीचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते.
सरकारने रुग्णवाहिका, पारिचारिका व डॉक्टर यांचा यावेळी बंदोबस्त केलेला होता तर घटनेवेळी या यंत्रणा कुठे होत्या असा सवाही उपस्थित केला.

अंबादास दानवे म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा एका विचाराला दिलेला पुरस्कार होता. सरकारने किंवा खाजगी संस्थेने हा सोहळा आयोजित केला होता का याची माहिती, मंत्री महोदयांनी दिली पाहिजे अशी मागणी करत ते पुढे म्हणाले की, जर एका राजकीय पक्षाने किंवा खाजगी संस्थेने हा सोहळा आयोजित केलेला असता आणि त्यामध्ये एवढे बळी गेले असते तर सरकारने याकडे दुर्लक्ष केले असते का? असा सवालही उपस्थित केला.

हॉस्पिटलच्या व्यवस्थेकडे आपण बघितले तर रुग्ण प्राथमिक उपचार घेण्यासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यानंतर पुढील उपचार घेण्यासाठी ते एमजीएम हॉस्पिटलमध्ये गेले . श्री सदस्यांचे संस्कार असे आहेत की, ते आपल्या गुरूंच्या विचारांवर विश्वास ठेवून कधीही कोणत्याही घटने बाबतीत तक्रार करत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक सुद्धा तक्रार करत नाहीत. त्यामुळे सदर घटनेबाबत कोणी तक्रार केली नाही म्हणून सरकारने कोणती कार्यवाही करायची नाही का ? असा प्रश्न विचारत अंबादास दानवे यांनी सरकारला जाब विचारला.

अंबादास दानवे पुढे म्हणाले की, या दुर्घटनेची चौकशी करण्यासंदर्भात जी समिती गठीत करण्यात आलेली आहे, तिला वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. दुर्घटनेत बळी गेलेल्या लोकांच्या मृत्यु बाबतीत सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा विषय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचा न राहता गृह मंत्रालयाचा हा प्रश्न बनतो अशी माहितीही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

विधिमंडळाच्या सचिवांनी गृह विभागाला सुद्धा सूचना देणे आवश्यक होते. सदर कार्यक्रम होण्यापुरता मर्यादित सांस्कृतिक कार्य विभागाचा हस्तक्षेप आहे. त्यानंतर तपास करणे हे गृह मंत्रालयाचे काम आहे. या चर्चेवर गृह मंत्रालयाचे सुद्धा उत्तर देणे अपेक्षित असल्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली.

दरम्यान, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या आरोपाला उत्तर देताना म्हणाले, रायगड जिल्ह्यातील खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेली घटना ही दुर्देवी आहे. या घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या विनंतीनुसार, शासनाने समितीला एक महिन्याकरिता मुदतवाढ दिली.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, हा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी येथील व्यवस्थेबाबत श्री सदस्यांसोबत तसेच संबंधित यंत्रणांसोबत चर्चा करून वेळेच्या निश्चितीसह सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली होती. येथील व्यवस्थेमध्ये ३५०० श्री सदस्य सहभागी झाले होते. व्यवस्थेबाबत सर्व नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली होती. कार्यक्रमासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित अनुयायांसाठी पाणी, वैद्यकीय सेवा, प्रथमोपचार किट, रूग्णवाहिका, सुलभ शौचालय, दळणवळण व्यवस्था, वाहनतळ, मैदान साफसफाई, कार्यक्रम सुकरपणे पाहता यावा यासाठी ३० मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था आदी आवश्यक सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. लाखो नागरिक उपस्थित राहणार असल्याने आणि ३०६ एकर क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम आयोजित होणार असल्याने मंडप टाकल्यास हवा खेळती राहण्यास समस्या निर्माण होईल, यामुळे तो निर्णय घेण्यात आला नाही. हवामान विभागामार्फत वर्तविण्यात आलेल्या तापमानाच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्षात तापमान आणि आर्द्रता अधिक वाढल्याने समस्या निर्माण झाली. तथापि, आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी चार हजार खाटांची व्यवस्था ठेवण्यात आली होती असे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

Check Also

महापारेषणच्या पडघे-कळवा उपकेंद्रात भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित

महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात आज दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ४०० के. व्ही. अति उच्च दाब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *