Breaking News

मुंबई – सेंट पीटर्सबर्ग सिस्टर सिटीमध्ये सामंज्यस्य करार करारामुळे उभय देशातील मैत्रीसंबंध दृढ होणार- अध्यक्ष राहुल नार्वेकर

भारत – रशियामध्ये राजकीय आणि वैचारिक नाते आहे. याचबरोबर मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या शहराला सिस्टर सिटीची परंपरा लाभली आहे. या सिस्टर सिटी संदर्भात भविष्यात होणाऱ्या सामंजस्य करारामुळे रशिया आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील असे, विधानसभेचे अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

विधिमंडळात रशियाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. मुंबई-सेंट पीटर्सबर्गमधील प्रस्तावित सामंजस्य करारासंदर्भात विचार विनिमय या भेटीदरम्यान करण्यात आला.

अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या दोन्ही शहरांना सिस्टर सिटीची ५५ वर्षाची परंपरा आहे. या सिस्टर सिटी संदर्भातील सामंजस्य करारामुळे दोन्ही शहरांसह देशांतील नागरी, कृषी, व्यापार संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी सहकार्य लाभणार आहे. रशिया भारताचा जुना मित्र देश असून, संसदीय, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पद्धतीच्या देवाणघेवाणीमुळे उभय शहरासह देशांमध्येही नाते वृद्धिंगत होणार आहे. करारावर चर्चा करण्यासाठी भारतास भेट दिल्याबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी शिष्टमंडळाचे आभार मानले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, उभय देशांत वैचारिक, राजकीय संवाद आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रशियासोबत मैत्रिपूर्ण संबंध अधिक दृढ केले आहेत. भविष्यातही व्यापार, तंत्रज्ञान, शाश्वत विकास, कृषी क्षेत्रातील संशोधन, राजकारण, साहित्य यासंदर्भात विचारांची देवाण-घेवाण करून प्रगतीसाठी संयुक्तिकरित्या प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उभय देशाच्या प्रगतीसाठी रशियाने संसदीय कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी भारत भेट दिली याचा आनंद झाला असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

सेंट पीटर्सबर्ग विधानसभेचे अध्यक्ष अलेक्झांडर बेलस्की यांनी मुंबई शहराच्या संस्कृती, पर्यटन, पायाभूत सुविधा, दळणवळण, पाणीपुरवठा, चित्रपटसृष्टी व्यवस्थानाबाबत कौतुक केले. तरूणांना शिक्षणासाठी पिटर्सबर्ग येथे पाठविल्यास आम्ही शैक्षणिक सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विधिमंडळाचे आमदार रईस शेख, अमिन पटेल, सचिव जितेंद्र भोळे यांच्यासह सेंट पीटर्सबर्ग विधानसभेच्या युनायटेड रशिया पक्षाच्या प्रमुख पावेल कुरपिंक, सेंट पीटर्सबर्गच्या विधानसभेच्या संपादकीय कमिटीचे उपाध्यक्ष ओलेगा मीयुता, सेंट पीटर्सबर्गच्या विधानसभेच्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्यक्ष श्रीमती आखो दोवा नर्गिस, रशियन फेडरेशन संघाचे महावाणिज्यदूत एच. इ. आलसकी सुरोस्तव, मुंबई रशियन हाऊसचे उप-वाणिज्य दूत तथा संचालक डॉ. एलिना रेमजोव्हा, रशियन फेडरेशनच्या वाणिज्यदूत जोरजी डेरे इर, वाणिज्यदूत येलेक्सी कलगीन, मुंबईच्या रशियन फेडरेशनचे उपवाणिज्यदूत ॲलेक्स क्री सिलिनिकोव यावेळी उपस्थित होते.

या शिष्टमंडळाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला भेट दिली आणि कामकाजा संदर्भात माहिती जाणून घेतली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

भल्या पहाटे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढविण्याच्या महानगरपालिकेला सूचना

शहरात काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *