Breaking News

समीर भुजबळ यांचे प्रत्युत्तर, …फर्नांडीस कुटुंबियांचा राजकारणासाठी वापर

गेली अनेक वर्ष अंजली दमानिया यांच्याकडून भुजबळ कुटुंबियांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरु आहे. नुकतीच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार सभा पार पडली. त्या अनुषंगाने पुन्हा मंत्री छगन भुजबळ यांना व कुटुंबियांना बदनाम करण्याचे कारस्थान अंजली दमानिया करत असून अंबड येथील सभा व मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका याचा फर्नांडीस कुटुंबियांचा दुरान्वयेही संबंध नसतांना राजकारणासाठी वापर करत आहे, अशी टीका मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून होत असलेल्या आरोपांबाबत खुलासा करण्यासाठी आज नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष समीर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी समीर भुजबळ म्हणाले की, ओबीसींचा महाएल्गार मोर्चा पाहून भुजबळांना बदनाम करण्याचे षडयंत्र होत असून त्यासाठी अंजली दमानिया फर्नांडीस कुटुंबियांचा राजकारणासाठी वापर करत आहे. यातील फर्नांडिस कुटुंबियांबद्दल आम्हाला सहानुभूती असून त्यांनी या राजकारणाला बळी पडू नये असे आवाहन समीर भुजबळ यांनी फर्नांडिस कुटुंबियांना या निमित्ताने केले.

समीर भुजबळ पुढे बोलताना म्हणाले, तसेच अंजली दमानिया राजकीय स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडून भुजबळ कुटुंबियांवर जे आरोप केले जात आहे ते निखालस खोटे असून भुजबळ कुटुंबियांना केवळ बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. अंजली दमानिया यांच्याकडे स्वतःसाठी वकिलांची फौज आहे, आमच्या विरुद्ध मोठमोठ्या वकिलांची नियुक्ती त्यांनी केली. मग ह्या कुटुंबासाठी सहानुभूती आहे असे त्या म्हणता मग या प्रकरणासाठी एखादा वकील २०१७ पासून का त्यांना द्यावा वाटला नाही ? असा सवाल देखील उपस्थित केला.

या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देताना समीर भुजबळ म्हणाले, आम्ही जी जागा खरेदी केली. ही सदर जागा हि बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्ट च्या मालकीची असून फ्रान्सिस फर्नांडिस हे लिझ होल्डर म्हणजे मालक होते. त्यांनी त्यांची मुलगी शैला अथायडे ह्यांना दिले होते. म्हणजेच त्या ह्या जागेच्या खऱ्या मालक होत्या व त्यांनी सदर जागेसंबंधी हक्क POA द्वारे त्यांचे भाऊ श्री व सौ फर्नांडिस ह्यांना दिले होते. ह्या प्रकरणी कोर्टात फर्नांडिस कुटुंबियांनी सन १९९४ मध्ये कन्सेंट टर्म्स फाईल करून सर्वप्रथम मेसर्स पाल्म शेल्टर्स ह्या रहेजा बंधूंच्या कंपनीसोबत व्यवहार केला होता. त्यांनी १० वर्षे काहीही काम केले नसल्यामुळे श्री व सौ फर्नांडिस हे नव्या डेव्हलपर्सच्या शोधात होते, त्याकामी त्यांना  फ्रेडरिक नर्होणा ह्या सोसायटीच्या सचिवांना नवीन डेव्हलपर शोधावा ह्यासाठी विनंती केली. त्यानुसार आमच्या मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या संपर्कात ते आले आणि त्यांनी सर्व विषय मांडला. त्यानुसार रहेजा बंधूंच्या कंपनीसोबत सर्व कायदेशीर व्यवहार पूर्ण करून व श्री व सौ फर्नांडिस यांच्या सहमतीने फ्रेडरिक नर्होणा यांच्या कंपनीशी करार करून फर्नांडिस कुटुंबियांना त्याच सोसायटीमध्ये इतरत्र बांधकाम चालू असलेल्या इमारतीत फ्लॅट देण्याचे ठरले होते व तसा करार करूनच सदर जागेची डेव्हलपमेंट करण्यात आली असल्याचे सांगितले.

समीर भुजबळ पुढे म्हणाले की, सदर जागेवर बांधकाम सुरु केल्यानंतर सन २००६ साली आमचे फ्रेडरिक नर्होणा ह्यांच्याशी पटत नाही, त्यांनी आम्हाला पैसे दिले नाही, अशी भूमिका फर्नांडिस यांनी घेतली. त्यानंतर आम्ही फ्रेडरिक नर्होणा ह्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांचे बांधकाम सुरु आहे व लवकरच त्यांना पझेशन देण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु हे श्री व सौ फर्नांडिस हयांना मान्य नसल्यामुळे त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही केला. परंतु त्यांच्या भूमिकेमुळे सफल झाला नाही. दरम्यान २०१४ साली त्यांनी समक्ष भेटून फ्लॅट च्या मोबदल्यात पैसे घेण्याचे मान्य केले व त्यासाठी बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्ट ला पत्र सुद्धा दिले कि परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या नावे लिझ ट्रान्सफर करावी. परंतु POA देणारी व्यक्तीच म्हणजे श्रीमती शैला अथायडे ह्यांचे निधन झाल्यामुळे पुढे काहीही होऊ शकले नसल्याचे स्पष्ट केले.

या प्रकरणी समीर भुजबळ बोलताना म्हणाले, दुर्दैवाने त्यानंतर आमच्या राजकीय हितशत्रूंच्या संपर्कात ते कुटुंबिय आले आणि पोलिसात तक्रारी करणे, समाजमाध्यमात आरोप करून बदनामी करणे इत्यादी प्रकार सुरु झाले. तरीसुद्धा परस्पर सहमतीने मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आम्ही सोडला नाही व त्यांच्या परिचयातील व्यक्तींद्वारे व सोसायटीमधील सभ्य लोकांना मध्यस्ती करण्याची आम्ही विंनती केली. परंतु ज्या व्यक्तींकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला त्यांच्याविरुद्ध सुद्धा तक्रारी करण्यात आल्या. तदनंतर सदर प्रॉपर्टी ED ने जप्त केली व श्री. फर्नांडिस हे ED प्रकरणातील साक्षीदार असल्यामुळे तसेच आमचे हितशत्रू अंजली दमानिया ह्यांच्याशी संपर्कात असल्यामुळे फर्नांडिस कुटुंबियांशी आपण होऊन संपर्क करणे शक्य नव्हते अन्यथा साक्षीदारांवर दबाव आणल्याचा आरोप झाला असता. मधल्या काळात २०१६ साली सदर प्रकरणी त्यांच्याकडून उच्च न्यायालय येथे पिटिशन दाखल करण्यात आली होती. ती पिटीशन फेब्रुवारी २०१७ साली सदरची याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली. सदरबाबत अपिलीय ट्रिब्युनल कडे दाद मागावी असे उच्च न्यायालयाने त्यांना निर्देश दिले होते. परंतु आजतागायत त्यांच्या वकिलांद्वारे तशी पाऊले उचलण्यात आली नाहीत अथवा ज्यांच्याकडे वकिलांच्या फौजा आहेत त्या हितचिंतकांतर्फे सुद्धा तसे केले गेले नाही कारण स्पष्ट आहे कि हे प्रकरण मिटण्यापेक्षा ते मिटू नये जेणेकरून त्याचा राजकीय हत्यार म्हणून वेळो- वेळी वापर करता यावा हाच हेतू असल्याचे प्रत्यारोप केला.

समीर भुजबळ म्हणाले की, विशेष बाब म्हणजे मागील वर्षी अंजली दमानिया ह्यांनी सुप्रिया सुळे ह्यांच्या मार्फत संपर्क साधला व त्यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. ह्याबाबत आम्हाला विचारणा केली असता आमचेकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला, त्यावेळी क्लाउड फर्नांडिस यांचे निधन झाल्याचेही समजले. तेव्हा सुरुवातीलाच रु. ५० लक्ष चा धनादेश आम्ही विनाअट देऊ केला. तो त्यांनी स्वीकारला. परंतु वठविला नाही. सौ. सुप्रिया सुळे ह्यांच्या मध्यस्थीमुळे आणि श्रीमती फर्नांडिस ह्यांचे वय बघता जवळपास सर्व मागण्या किंवा त्यांनी करारानुसार पूर्तता करण्याच्या सर्व अटी-शर्ती आम्ही बाजूस सारून व वकिलांचे सल्ल्यांविरुद्ध फक्त रिलीझ डीड सारखे एखादे करारपत्र करावे व ED ट्रिब्युनल मध्ये परवानगीसाठी जावे लागू शकते, त्यात त्यांनी सहकार्य करावे आणि आमची मोबदला देण्याची जबाबदारी नाही अशी भूमिका घेऊ शकलो असतो. मात्र माणुसकीच्या नात्याने आणि सहानुभूतीमुळे आम्ही तडजोड करण्यास तयार झालो व त्यांच्या फ्लॅट च्या बदल्यात मोबदला देण्याचे ठरवले होते. सर्व बोलणे अंतिम होऊन मागील महिन्यात कराराचा ड्राफ्ट त्यांच्या वकिलांना पाठवण्यात आला, अपेक्षेप्रमाणे ED ट्रिब्युनलच्या परवानगीची आवश्यकता आहे असे निष्पन्न झाले. त्यासाठी सहकार्य करावे हि विनंती आम्ही केली. परंतु तसे करण्यास नकार देण्यात आला व भेटून चर्चा करण्यासही नकार दर्शवला असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, माणुसकीच्या नात्याने आणि सहानुभूतीमुळे आम्ही फर्नांडिस कुटुंबियांना वेळोवेळी सहकार्य केले आहे व करण्याची आमची तयारी आहे. हे प्रकरण पूर्णपणे करारपत्रे व त्यासंबंधीचा वाद असा आहे. न्यायालय यावर जोही निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे. त्यासाठी आम्ही देखील फर्नांडिस कुटुंबियांना सहकार्य करत आहोत. मात्र अंजली दमानिया ह्या फर्नांडिस कुटुंबियांची मदत करण्याच्या बहाण्याने या प्रकरणाचे राजकीय हत्यार म्हणून वापर करीत आहेत. त्यामुळे आमचे फर्नांडिस कुटुंबियांस आवाहन राहील की, त्यांनी राजकीय स्टंटबाजीचा भाग होण्यापेक्षा योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन केले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

आदित्य ठाकरे म्हणाले, गुन्हा होऊच शकत नाही…मी तेथील आमदार

दक्षिण मुंबईतील डिलाईल रोड पूलाची एक लेन पूर्णपणे तयार असताना मागील १० दिवसांपासून बंद ठेवण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *