Breaking News

मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा, महिलांच्या विकासाचे चौथे महिला धोरण जाहीर करणार

महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले व या ध्येयासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारे राज्याचे चौथे महिला धोरण उद्याच्या महिला दिनी म्हणजेच ८ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

महिला आर्थिक विकास मंडळ व युनायटेड नेशन्स वुमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, यूएन वुमन्सच्या राष्ट्रीय प्रतिनिधी सुझन फर्ग्युसन, टाटा समाजिक विज्ञान संस्थेच्या लक्ष्मी लिंगम, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे आदी उपस्थित होते.

महिलांचा विकास हे उद्दिष्ट ठेऊन राज्यात आतापर्यंत ३ महिला धोरणं जाहीर करण्यात आल्याचे सांगून मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, या तिन्ही धोरणांपेक्षा वेगळे आणि अंमलबजावणीवर भर देणारे असे हे चौथे महिला धोरण असणार आहे. या धोरणामध्ये महिलांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसोबतच यामध्ये अष्टसुत्रीचा समावेश आहे. त्यामध्ये आरोग्य, पोषक आहार, शिक्षण, कौशल्य, महिला सुरक्षा, महिलाबाबतच्या हिंसाचाराच्या घटना थांबवणे, लिंग समानता, पुरक रोजगार, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती टाळणे यामध्ये महिलांचा समावेश तसेच खेळाडूंना आर्थिक सहाय्य, सांस्कृतिक क्षेत्रात महिलांचा सहभाग याचा समावेश या महिला धोरणामध्ये आहे. या धोरणामुळे समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता येण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभागाने हे महिला धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये अंमलबजावणीवर भर असणार आहे. त्यासाठी त्रिसुत्री ठरवण्यात आली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असेल. तर जिल्हास्तरावरील अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असेल. या धोरणाच्या माध्यमातून महिला अधिक स्वावलंबी होतील. समाजामध्ये स्त्री-पुरूष समानता येण्यासाठी महिलांचे अवलंबित्व कमी होणे गरजेचे आहे. यासाठी या धोरणामध्ये भर देण्यात आला आहे. तसेच सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचे नियोजनही या धोरणामध्ये करण्यात आले आहे.

मंत्री अदिती तटकरे पुढे म्हणाल्या, समाजामध्ये स्त्री – पुरुष समानतेविषयी नेहमीच चर्चा केली जाते. ही समानता येण्यासाठी पुरुषांनीही साथ देणे गरजेचे आहे. महिला दिन हा वर्षातून एकदा नाही तर रोज साजरा केला जावा. येत्या काळात माविमच्या माध्यमातून महिलांना आणखी चांगले अर्थसहाय्य मिळेल. त्या माध्यमातून अनेक महिला उद्योजक निर्माण होतील व राज्यासह देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहभागी होतील. अनेक महिला नवनवीन उद्योग उभारत आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

महिला व बाल विकास विभागाचे सविच यादव म्हणाले, महिलांना आता नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन नवीन क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे. लोणची, पापड यामधून बाहेर पडून इतर क्षेत्रामध्ये काम केले पाहिजे. शेती क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्यास वाव आहे. या क्षेत्रामध्ये आता महिलांनी काम करावे.

यावेळी बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये समुद्री शैवाल उत्पादनामध्ये चांगले काम करणाऱ्या रत्नागिरीच्या वर्षा गोरिवले, हायड्रोफोनिक शेती करणाऱ्या लता जाधव, दूध व दुग्धजन्य पदार्थामधून आर्थिक स्थैर्य साधणाऱ्या गोंदियाच्या ममता ब्राह्मणकर, आदिवासी भागात काम करणाऱ्या यवतमाळच्या कल्पना लिंमजी मंगाम, सरपंच म्हणून ग्रामविकासाचे रोल मॉडेल तयार करणाऱ्या नंदुरबारच्या कैशल्या वडवी आणि छ. संभाजीनगरच्या वर्षा सांगळे यांच्या सन्मान करण्यात आला.

Check Also

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *