Breaking News

२१७ सदनिकांसाठी २ जून रोजी सोडत सुमारे ६६ हजार अर्जः वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण

मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील २१७ सदनिकांच्या संगणकिय सोडतीकरीता ६६ हजार ८४ अर्ज प्राप्त झाले आहेत. रविवारी ०२ जून, २०१९ रोजी वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील प्रांगणात सकाळी १० वाजता या अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.
सोडती संदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाली असून सोडती करता म्हाडा प्रशासन सज्ज झाले आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या समारंभात ‘म्हाडा’चे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीकरिता प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उपनगरचे माननीय पालकमंत्री विनोद तावडे, मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे  सभापती विजय नाहटा, कोंकण मंडळाचे माननीय सभापती बाळासाहेब पाटील, खासदार पूनम महाजन, आमदार तृप्ती सावंत, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई मंडळातर्फे ०६ मार्च. २०१९ रोजी २१७ सदनिका विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यंदाच्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटाकरिता सहकार नगर, चेंबूर येथील १७० सदनिका व मध्यम उत्पन्न गटाकरिता ४७ सदनिकांचा समावेश आहे. सोडतीमध्ये प्राप्त सर्व सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे. अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्याकरिता १३ एप्रिल, २०१९ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या पार्श्वभूमीवर लागू आचारसंहितेमुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानुसार अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्याकरिता, ऑनलाईन पेमेंट व आरटीजीएस / एनईएफटी द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी २४ मे, २०१९ रोजी पर्यंत मुदत वाढविण्यात आली.
म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावरून वेबकास्टिंगद्वारे या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहण्याकरीता http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मंडपातील तीन एलईडी स्क्रीन्सवर पाहता येणार आहे. सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षायादीवरील अर्जदारांची नावे https://lottery.mhada.gov.inव https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

Check Also

पियुष गोयल यांच्या विरोधात बातमी छापल्याने पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या “गोयल यांना सोसवेना मासळीचा वास” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *