Breaking News

बस, लोकल रेल्वे, मोनोचा प्रवास आता एकाच तिकिटावर एकात्मिक तिकिट प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई महानगर प्रदेशात कामाच्या निमित्ताने बस, लोकल रेल्वे आणि मोनोने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना वेगवेगळे तिकिट काढावे लागते. त्यात प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर वेळ जात असल्याने या सर्व वाहतूक व्यवस्थेचे एकाच कार्डावर तिकिट उपलब्ध व्हावे यासाठी एकात्मिक तिकिट प्रणालीच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएला दिले. त्यामुळे बस, लोकल रेल्वे आणि मोनोचा प्रवास एकाच कार्डावर उपलब्ध होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशासाठी तयार करण्यात येत असेलल्या एकात्मिक तिकीट प्रणालीच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यु. पी. एस. मदान, सह-आयुक्त संजय देशमुख, के. विजयालक्ष्मी यांच्यासह रेल्वे, मेट्रो, परिवहन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. तिकिट प्रणाली सुरू करण्यासंदर्भात नेमलेल्या पीएमसी या सल्लागार कंपनीचे मनीष अग्रवाल यांनी सादरीकरण केले. तसेच यावेळी या प्रणालीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. या प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचे काम १ मार्चपासून सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

बेस्ट, रेल्वे, मोनो व मेट्रो, मुंबई तसेच आसपासच्या प्रदेशातील ठाणे, मिरा भाईंदर, नवी मुंबई येथील परिवहन सेवांसाठी एकच तिकिट प्रणाली असणार आहे. ही तिकिट प्रणाली अकाउंटबेस स्मार्ट कार्डच्या रुपात असून त्यामध्ये कुठुनही रिचार्ज करता येणार आहे. या प्रणालीच्या कार्यचालनासाठी विशेष उद्देश वहन कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बेस्ट, मोनोरेल व रेल्वेसाठी ही तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात नवीन मेट्रो लाईन, इतर सार्वजनिक वाहतूक सेवांचा समावेश होणार असून याबरोबरच नंतर वाहनतळ, टोल, टॅक्सी, रिक्षा यांचाही समावेश या प्रणालीत करण्यात येणार आहे.

प्रवाशांची सोयीसाठी ही तिकिट प्रणाली उपयुक्त असून यामुळे वेळ व पैसा वाचणार आहे. या प्रणालीचे काम लवकरात लवकर सुरू करावे. तसेच फक्त मुंबई महानगरा पुरतेच स्मार्ट कार्ड न ठेवता राज्यातील कुठल्याही शहरात सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी वापरता येण्याजोगी व्यवस्था करावी असे आदेशही त्यांनी दिले.

Check Also

पियुष गोयल यांच्या विरोधात बातमी छापल्याने पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या “गोयल यांना सोसवेना मासळीचा वास” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *