Breaking News

सावधान ! मॅट्रीमॉनिअल संकेतस्थळावरून फसवणूकीची शक्यता सावधगिरी बाळगण्याचे सायबर विभागाचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

मॅट्रीमॉनिअल संकेतस्थळावर सायबर भामट्यांकडून लोकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यापासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे करण्यात येत आहे. सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलं /मुलींचे पालक आपल्या पाल्याच्या लग्नासाठी योग्य जोडीदार निवडीसाठी अनेक मॅट्रीमॉनिअल संकेतस्थळावर नोंदणी करतात, तसेच विवाह जमविणाऱ्या बऱ्याच संस्थांनीही स्वतःचे संकेतस्थळ सुरु केले आहे. यावर उपवर मुले-मुलींच्या पालकांना नोंदणी करण्यास सांगत आहेत. अशी संकेतस्थळे सायबर भामट्यांकरिता आर्थिक फसवणूक करण्यासाठी किंवा हा सर्व डेटा डार्कनेटवर किंवा इंटरनेटच्या काळाबाजारात विकण्यास एकदम सोपे लक्ष्य आहे, अशा मॅट्रीमॉनिअल संकेतस्थळावर फसविले जाणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. दुर्दैवाने यामध्ये फसविले गेलेल्यांमध्ये मुलींची संख्या ही मुलांच्या तुलनेने जास्त आहे.

फसवणुकीचे  प्रकार

१) जेव्हा अशा प्रोफाईल बनविल्या जातात तेव्हा काही दिवसातच तुम्हाला प्रोफाईल जुळल्याची सूचना येते, यात बऱ्याचदा ही प्रोफाईल्स कोणत्यातरी परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची असतात. (आपल्याकडे परदेशात राहणाऱ्या भारतीयांबद्दल विशेषतः उपवर मुलींच्या पालकांच्या मनात सुप्त आकर्षण असते त्यामुळे सायबर भामटे मुख्यतः अशाच प्रोफाईल चा आधार घेतात)  हळूहळू संवाद वाढतात, ओळख वाढते व समोरील व्यक्ती कालांतराने आपल्या बोलण्याने मोहित करते. ते कधी ऑनलाईन बोलतात फार आग्रह केला तरच व्ही.डी.ओ. कॉल होतो. मग एके दिवशी ती व्यक्ती तुम्हाला सांगते की, परदेशातून तुम्हाला काही महागडी भेट वस्तू पाठवत आहे. नंतर फोन येतो की, तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे व कस्टम क्लिअरन्सकरिता अडकले आहे त्यामुळे एका ठराविक अकाउंट मध्ये ठराविक रक्कम भरावी. त्यानंतर दोन दिवसांत तुमचे पार्सल तुम्हाला मिळेल. पैसे अकाउंटमध्ये भरले की, ना पार्सल येते ना तो क्रमांक पुन्हा लागतो. तसेच तुम्ही ज्या प्रोफाईलवरील व्यक्तीशी बोलणे चालू होते ती प्रोफाईल व सोशल मिडिया अकाउंट अचानक निष्क्रिय होतो.

२) या प्रकारात वरील प्रमाणेच ओळख होते व दोन्ही बाजूला संभाषण प्रकार क्रमांक एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे सुरु होते, संभाषणात एकमेकांबद्दल जवळीक निर्माण होऊन अनेक वैयक्तिक खाजगी  छायाचित्र व माहिती शेअर केली जाते. हळूहळू समोरची व्यक्ती मग तुम्हाला धमकावण्यास सुरुवात करते की, अमुक एवढी रक्कम तुम्ही न दिल्यास तुमचे छायाचित्र व माहिती सोशल मिडिया वर प्रसारित केली जाईल.

३)  या प्रकारात वरील प्रमाणेच ओळख होते व दोन्ही बाजूला संभाषण प्रकार क्रमांक एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे सुरु होते, पण या प्रकारात मुख्यतः फसविली जाणारी व्यक्ती या  एकतर घटस्फोटित, किंवा ज्यांचे जोडीदार जग सोडून गेलेत, किंवा ज्यांची लग्न काही कारणाने होऊ शकले नाहीत अशा व्यक्ती असतात त्यातपण महिलांची संख्या अधिक आहे. संभाषण सुरु झाल्यावर प्रकार क्रमांक एक प्रमाणेच समोरील व्यक्ती कधी तुम्हाला महागडी भेट वस्तू अडकली आहे या कारणाने, तर कधी आपण आर्थिक विवंचनेत आहोत असे भासवून काही रक्कम घेते व नंतर गायब होते.

सावधगिरी

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि आपण जर या अशा मॅट्रीमॉनिअल संकेतस्थळाचा वापर करत असाल तर सावध राहा. प्रोफाईल बनविताना आपली सर्वच माहिती त्यात देऊ नका तसेच फक्त एखाद दुसरा फोटोच अपलोड करा. प्रत्यक्ष मुलाचा किंवा मुलीचा मोबाईल क्रमांक देऊ नका घरातील कोणत्यातरी वयाने मोठ्या व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्रमांक संपर्क क्रमांक म्हणून द्या. तसेच परदेशातील भारतीय प्रोफाईलने जुळल्याने हुरळून जाऊ नका, उलट अशा स्थळांची अजून सखोल चौकशी करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये अगदी समोरची व्यक्ती खरी आहे याची तुम्हाला खात्री झाली तरी देखील आपली सर्व वैयक्तिक माहिती व खाजगी छायाचित्र शेअर करू नका. तसेच जर अशी व्यक्ती तुमच्याकडे काही आर्थिक मदत मागत असेल तर वेळीच सावध राहा. ज्या व्यक्ती विशेष करून महिला ज्या पुनर्विवाह करण्यास इच्छुक आहेत त्यांनी तर जास्त सावध राहणे गरजेचे आहे. सायबर भामटे अशाच व्यक्तींना विशेषतः महिलांना आपले लक्ष करत असतात.

महाराष्ट्र सायबर या सर्व मॅट्रीमॉनिअल वेबसाईट व ज्या विवाह संस्था ऑनलाईन नोंदणी करत आहेत त्यांना देखील विनंती करते कि सावध राहा. आपल्याकडे नोंदणी करणाऱ्या विवाह इच्छुक व्यक्तीस नोंदणी करताना आपले ओळखपत्र पण अपलोड करायला सांगा. विशेषतः परदेशातील भारतीय नागरिक जर नोंदणी करत  असतील तर त्यांच्याकडून ओळखपत्र म्हणून त्यांच्या पारपत्राची प्रत देणे हे अनिवार्य करा तसेच त्यांना भारतामध्ये राहणाऱ्या त्यांच्या एका नातेवाईकाचा पत्ता व ओळखपत्र देणे बंधनकारक करा. तुमची वेबसाईट ही सुरक्षित आहे याची वेळोवेळी खात्री करून घ्या कारण तुमच्या वेबसाईटचा वापर करून उद्या कोणत्याही व्यक्तीची आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारे फसवणूक झाली तर माहिती तंत्रज्ञान कायदा २०००, कलम ७९(३)(ब) अंतर्गत तुम्हाला पण जवाबदार धरले जाऊ शकते व तुमच्यावर देखील कायदेशीर कारवाई होऊ शकते.

तक्रार करा

तुम्ही जर एखाद्या अशा प्रकारच्या गुन्ह्यात फसले गेले असाल तर कृपया न घाबरता त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा व www.cybercrime.gov.in  या संकेतस्थळावर देखील त्याची नोंद करा. तसेच केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *