Breaking News

मन्सूर सिद्दीकींचा मराठी सिनेमा ‘राधे मुरारी’

मुंबई: प्रतिनिधी

आज जागतिक पातळीवर मराठी सिनेमांचा उदो, उदो होत आहे. केवळ हिंदीतीलच नव्हे, तर इतर प्रादेषिक चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची पावलेही मराठीकडे वळू लागली आहेत. मन्सूर अहमद सिद्दीकी हे एक बॉलीवुडमधील एक मोठे नाव. ‘साजन चले ससुराल’, ‘रंग’, ‘ताकत’, ‘दिल ने फिर याद किया’ या गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती करणारे मन्सूर सिद्दीकीही आता मराठीकडे वळले आहेत. ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटाच्या सिक्वेलच्या दिग्दर्शनासोबतच सिद्दीकी लवकरच ‘राधे मुरारी’ हा मराठी सिनेमाही घेऊन येत आहेत.

गोविंदा, करिश्मा कपूर, तब्बू यांची मुख्य भूमिका असलेला ‘साजन चले ससुराल’ हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. सुमधूर संगीत आणि विनोदी कथानकाचे अचूक मिश्रण असल्याने प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला. आता ‘साजन चले ससुराल २’च्या रूपात सिद्दीकी या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ते स्वत: करणार आहेत. या जोडीला ते मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘राधे मुरारी’ हा चित्रपट बनवत आहेत. शीर्षकावरून हा चित्रपट काहीसा सिद्दीकी स्टाईलचा असेल याचा अंदाज येतो. विनोदी कथानकाला मनोरंजनात्मक मसाल्याची फोडणी देत सिद्दीकी हा चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटातील मुख्य कलाकारांच्या नावांची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे. ‘साजन चले ससुराल २’ आाणि ‘राधे मुरारी’च्या लाँचिंग प्रसंगी दोन्ही चित्रपटांमधील महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा करण्यात येण्याची शक्यता आहे. अनास फिल्म्स मुव्हीजच्या बॅनरखाली एन. एन. सिद्दीकी या दोन्ही चित्रपटांची निर्मिती करणार आहेत.

सिद्दीकी यांनी आजवर नेहमीच प्रेक्षकांची आवड निवड जोपासत चित्रपट बनवले आहेत. कथानक आणि मनोरंजकमूल्यांची सांगड घालण्याची कला त्यांच्याकडे असल्याने ‘राधे मुरारी’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेली कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘राधे मुरारी’ आणि ‘साजन चले ससुराल’ या दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणाला लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *