Breaking News

सर्व निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरताना जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक वेळीच प्राप्त करून घ्यावे- राज्य निवडणूक आयुक्त मदान यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात पुढीलवर्षी २०२२ मध्ये होणाऱ्या सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, ग्रामपंचायती, पंचायत समितीच्या निवडणूकांसाठी आता उमेदवारी अर्ज सादर करतानाच संबधित उमेदवारांने जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु पी एस मदान यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांनी आतापासूनच वैयक्तिक स्तरावर जातवैधता प्रमाणपत्राची पूर्तता करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज्यभरातील महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायती या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात मोठ्या प्रमाणावर निवडणुका होणार आहेत. संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या कायद्यानुसार राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी प्रथमत: जात प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. त्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा. त्यादृष्टीने आतापासूनच संबंधितांनी तयारी करणे आवश्यक आहे. जेणे करून नामनिर्देशनपत्र सादर करताना ऐनवेळी कोणाचीही धावपळ होणार नाही आणि एकही इच्छूक उमेदवार जातवैधता प्रमाणपत्रा अभावी निवडणूक लढविण्यापासून वंचित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी निवडणूकीच्या कालावधीत जात वैधताप्रमाण पत्र मिळविण्यासाठी साधा अर्ज करण्यात आला तरी त्या अर्जाच्या पोच पावतीवरही उमेदवारी अर्ज ग्राह्य धरून तो राज्य निवडणूक आयोगाकडून स्विकारला जात असे. मात्र आता या नियमात दुरूस्ती करत उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा असेल तर जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तरच उमेदवारी अर्ज स्विकारला जाणार आहे.

Check Also

मैदानाची परवानगी बच्चू कडू यांच्याकडे मात्र अमित शाह यांची सभा नवनीत राणांसाठी

सध्याच्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. या त्यातच अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *