Breaking News

ग्रीन झोनमधल्या नांदेडमध्येही आता कोरोना जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात!: पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या अचानक २६ झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी भयभीत न होता अधिक खबरदारी बाळगावी, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
गेल्या आठवड्यापर्यंत नांदेडमध्ये एकही रूग्ण नव्हता आणि आज ही संख्या २३ ने वाढून २६ वर गेली. नांदेडमधील जुन्या ३ रूग्णांपैकी १ महिला परभणी जिल्ह्यातून उपचारासाठी आली होती, तर २ रूग्ण हे शहराच्या वेगवेगळ्या भागातील रहिवासी होते. या २ रूग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे नांदेड शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात आज वाढलेल्या २३ रूग्णांमध्ये २० जण गुरूद्वाराचे सेवेकरी तर ३ जण पंजाबहून परतलेले वाहनचालक आहेत.
गुरूद्वारात अडकलेल्या भाविकांना नेण्यासाठी पंजाबहून आलेल्या वाहनचालकांना प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला असावा आणि परतीच्या प्रवासात अनेक भाविकांनाही त्याची लागण झाली असावी, अशी शक्यता पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
कोरोना झालेल्या २० सेवेकऱ्यांमध्ये विषाणूची लक्षणे नव्हती. २६ एप्रिल रोजी पंजाबहून आलेल्या ७८ बसेसचे प्रत्येकी २ वाहनचालक-कर्मचारी नांदेडला मुक्कामी होते. त्यांनी लंगरमध्ये जेवणही घेतले होते. त्यातून सेवेकऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असावी. २३ एप्रिल रोजी पंजाबला गेलेल्या नांदेडच्या वाहन चालकांना देखील ते परतल्यानंतरच कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते, याकडे लक्ष वेधून चव्हाण यांनी नवीन २३ रूग्णांच्या संक्रमणाचा स्त्रोत नांदेड शहर नसून, तो बाहेरून आला असण्याचा अंदाज व्यक्त केला.
पंजाबच्या भाविकांना नांदेडच्या गुरूद्वारात कोरोना झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. गुरूद्वारात इतक्या मोठ्या प्रमाणात लागण झालेली असती तर नांदेड शहरातही संसर्गाचे तसेच मोठे प्रमाण दिसून आले असते. पण शहरात तशी परिस्थिती नाही. गुरूद्वारामधील बाबांनी देखील या प्रवाशांना नांदेडमध्ये लागण झालेली नसल्याचे सांगितले.
गुरूद्वारात या भाविकांची नियमित तपासणी सुरू होती. या भाविकांनी नांदेडला असताना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याची किंवा त्रास होत असल्याची तक्रार केली नव्हती. तशी कोणतीही नोंद नाही. तसे असते तर गुरूद्वारा प्रशासनाने त्यांची तातडीने तपासणी करून घेतली असती व त्यांच्यावर उपचार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना झालेले गुरूद्वारामधील २० सेवेकरी एकाच परिसरात वास्तव्यास होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या परिसरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तेथील नागरिकांच्या तपासण्या होत आहेत. हा संसर्ग त्याच भागात रोखण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे आणि कोणताही त्रास होत असेल तर तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *