Breaking News

प्रशिक्षित उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी करता येणार

महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिल यांनी प्रशिक्षीत उमेदवारांना नोंदणी दिली असून मंडळांतर्गत पॅरामेडिकल गटात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी नोंदणी करण्याकरीता तत्काळ अर्ज करावेत असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मंत्री लोढा म्हणाले, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलद्वारे नोंदणी करण्यास सुरूवात झाली आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाल्याने त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. “देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित आरोग्य सेवकांची मागणी वाढत आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी तर उपलब्ध आहेतच परंतु पगार देखील आकर्षक आहेत. या क्षेत्रात झपाट्याने बदलत जाणारे तंत्रज्ञान व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे नवीन कौशल्य, री-स्किलिंग व अप-स्किलिंगद्वारे नियमित प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. राज्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून राज्य शासन उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे सातत्याने प्रयत्न करीत आहे.

महसूल आणि रोजगार या दोन्ही बाबतीत आरोग्यसेवा हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्रात रुग्णालये, वैद्यकीय उपकरणे, क्लिनिकल चाचण्या, आउटसोर्सिंग, टेलिमेडिसिन, वैद्यकीय पर्यटन, आरोग्य विमा, वृध्दांची काळजी आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश होतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MOHFW) तयार केलेला अहवाल सूचित करतो की भारतातील प्रशिक्षित आरोग्य व्यावसायिकांची मागणी ५० लाख आहे, तर उपलब्धता केवळ १२ लाख आहे. तसेच एका डॉक्टर मागे साधारणत: ५ क्लिनिकल आणि ५ नॉन-क्लिनिकल आरोग्य सेवकांची आवश्यकता असते. कोविड व त्यानंतरच्या काळात मोठ्याप्रमाणात प्रशिक्षित आरोग्य सेवकांची आवश्यकता निर्माण झाली आहे. विकसित देशात वृध्दांची काळजी घेण्याच्या (Old age care) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढली आहे.

भारतात वैद्यकीय पदवी व पदुव्यत्तर शिक्षण उच्चत्तम गुणवत्तेचे आहे. वैद्यकीय पदवी व पदुव्यत्तर शिक्षणानंतर राज्य वैद्यकीय परिषदेद्वारे नोंदणी करण्यात येते. त्याच प्रमाणे आरोग्य सेवकांसाठी पदविका (Diploma) अभ्यासक्रमांत व प्रमाणपत्र (Certificate) अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी देण्याचे निर्देशीत आहे.

मंडळाद्वारे पॅरामेडिकल गटातील ३० प्रमाणपत्र अभ्यासक्रम व ११ पदविका अभ्यासक्रमात प्रति वर्षी राज्यभरातील ३०० संस्थांमधून साधारणत: १० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येते. तथापि, विविध नियामक संस्थांच्या अटी व परदेशात आरोग्य क्षेत्रात नोकरीसाठी सक्षम यंत्रणेकडे नोंदणी असणे अनिवार्य असल्याने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. ‍आता मंडळाच्या पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलद्वारे नोंदणी देण्यास प्रारंभ झाला आहे. मंडळाने पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत मागील ३ वर्षात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचे निकालपत्र महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांच्याकडे नोंदणी प्रक्रियेत पडताळणीसाठी सादर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र व गुणपत्र पडताळणी सोयीस्कर झाले आहे.

नोंदणीकरिता अर्ज करण्याची पद्धत

https://www.maharashtraparamedicalcouncil.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. वैयक्तिक दस्तऐवज, मंडळाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र व गुणपत्र अपलोड करावे व अर्ज शुल्क भरावे. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांच्याद्वारे अर्जांची छाननी व पडताळणी करण्यात येईल. कौन्सिलद्वारे ई-मेलद्वारे कळविण्यात आल्यावर नोंदणीशुल्क भरावे. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांच्याद्वारे नोंदणी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल. अधिक माहितीकरीता मंडळाचे संकेतस्थळ https://msbsvet.edu.in वर माहितीपुस्तिका उपलब्ध आहे.

पॅरामेडिकल क्षेत्रातील लोकप्रिय अभ्यासक्रमामध्ये वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Medical Laboratory Technician), किरणोपचार/ अल्ट्रासोनिक तंत्रज्ञ (Radiography & Ultra-Sonography Technician), हृदयचिकित्सा तंत्रज्ञ (Cardiology Technician), मज्जातंतुशास्त्र तंत्रज्ञ (Neurology Technician), रक्तपेढी तंत्रज्ञ (Blood Bank Technician), ऑप्टोमेट्राय तंत्रज्ञ (Optometry Technician), शस्त्रक्रियागार तंत्रज्ञ (Operation Theatre Technician), रक्तशुद्धीकरण तंत्रज्ञ (Dialysis Technician) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

Check Also

आता शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात इन्फल्यूएंझाग्रस्तांसाठी कक्ष

राज्यात इन्फल्यूएंझाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. इन्फल्यूएंझाबाबत नियमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *