Breaking News

दिल्लीतील रूग्णालयाला लागलेल्या आगीत सात नवजात शिशूंचा मृत्यूः दोघांना अटक रूग्णालय रजिस्टर नसल्याची माहिती पुढे

दिल्ली पोलिसांनी रविवारी न्यू बॉर्न बेबी केअर रूग्णालयाच्या  मालकाला आणि डॉक्टरला अटक केली.  रूग्णालयात रात्री उशीराने मोठ्या प्रमाणात आग लागल्याने सात नवजात बालकांचा मृत्यू झाला. पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलचे मालक डॉ नवीन खिची यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.

याशिवाय, घटनेच्या वेळी रुग्णालयाच्या शिफ्टवर रूजू होण्यासाठी जात असलेल्या डॉ. आकाश (२५) यालाही पोलिसांनी अटक केली. दरम्यान सदरचे रूग्णालय हे दिल्ली आरोग्य विभागाकडे रजिस्ट्र नव्हते अशी माहितीही पुढे आली आहे.

या घटनेनंतर रुग्णालयाच्या मालकावर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणात आयपीसीचे कलम ३०८ (दोषी हत्येशी संबंधित) आणि कलम ३०४ (निष्काळजीपणामुळे मृत्यूशी संबंधित) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. आग लागली तेव्हा या आगीतून बारा नवजात मुलांची सुटका करण्यात आली, मात्र त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला. उर्वरित पाच बाळांवर अन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आग लागली आणि काही वेळातच ती शेजारच्या दोन इमारतींमध्ये पसरली. हॉस्पिटलच्या शेजारील दोन इमारतींमधून कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही, मात्र या आगीचा धग या दोन इमारतीमधील रहिवाशांना बसली.

पंतप्रधान कार्यालयाने सात नवजात बालकाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमी बालकांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, “दिल्लीतील एका हॉस्पिटलमधील आगीची दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या अत्यंत कठीण काळात माझ्या सदभावना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.”

तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रुग्णालयातील आगीला “हृदयद्रावक” असल्याचे सांगत घटनेच्या कारणांचा तपास केला जात आहे आणि जो कोणी या निष्काळजीपणासाठी जबाबदार असेल त्याला सोडले जाणार नाही” असा इशाराही यावेळी दिला.

Check Also

आदिवासी व दुर्गम भागात सुरक्षित संस्थात्मक प्रसुतीसाठी माहेरघर योजनेत सुधारणा

माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने राज्यातील आदिवासी व दुर्गम भागात माहेरघर योजना असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *