Breaking News

विक्रम गोखले-यतिन कार्येकरांच्या अभिनयाची जुगलबंदी येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’

मुंबई : प्रतिनिधी

काही मराठी कलाकारांनी केवळ हिंदीतच नव्हे तर इतर प्रादेषिक भाषांमधील चित्रपटांमध्येही आपलं वर्चस्व सिद्ध करीत रसिकांची दाद मिळवली आहे. विक्रम गोखले यांनी आजवर आपल्या अनुभवी अभिनय कौशल्याच्या बळावर मराठीपासून हिंदीपर्यंत बऱ्याच भूमिका सजीव केल्या आहेत. यांच्याच पावलावर पाऊल टाकत वाटचाल करणाऱ्या यतिन कार्येकरांनीसुद्धा लहान-सहान भूमिकांमध्येही जीव ओतला आहे. आता हे दोन्ही कलाकार ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ असं काहीसं हटके शीर्षक असलेल्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ या आगामी मराठी चित्रपटातून स्त्रीची कथा आणि व्यथा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महिलांचे अनेक प्रश्न आजवर चित्रपटांतून हाताळलेले आहेत. स्वत:शी तडजोड करून संसार करणाऱ्या अनेक महिलांच्या मनातील अस्वस्थता ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. स्त्रियांना भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांच्या जोडीला या सिनेमात विक्रम गोखले आणि यतिन कार्येकरांच्या अभिनयाची जुगलबंदीही पाहायला मिळेल. येत्या शुक्रवारी म्हणजेच ३० मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची प्रस्तुती ‘जयलक्ष्मी वैष्णवी फिल्म प्रोडक्शन’ यांची असून, निर्मिती भानुदास व्यवहारे व दत्तात्रेय मोहिते यांनी केली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी भानुदास व्यवहारे यांनी सांभाळली आहे.

या सिनेमातील दोन महत्त्वपूर्ण भूमिकांसाठी दोन दिग्गज अभिनेत्यांची गरज होती. पटकथालेखन करतानाच या भूमिकांसाठी मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदीतही आपला ठसा उमटविणाऱ्या विक्रम गोखले आणि यतिन कार्येकर यांचे चेहरे डोळ्यांसमोर आले. त्यांना जेव्हा या भूमिका करण्याबाबत विचारलं तेव्हा त्यांनी प्रथम सिनेमाची कथा ऐकली. पटकथेतील उत्कंठावर्धक वळणं, सिनेमात मांडण्यात येणारा ज्वलंत विषय आणि आपापल्या भूमिकांचा आवडलेला ग्राफ यामुळे दोन्ही कलाकारांनी क्षणाचाही विलंब न करता ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’मध्ये काम करायला होकार दिल्याचं दिग्दर्शक भानुदास व्यवहारे यांचं म्हणणं आहे.

वयात आलेल्या मुला-मुलीचं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच महत्त्वाचा असतो. ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ ही कथा आहे वर्षा आणि आकाश या तरुण जोडप्याची. एकमेकांच्या पसंतीने लग्न ठरलेल्या या दोघांच्या आयुष्याला लग्नानंतर अचानक कलाटणी मिळते. या कलाटणी नंतर वर्षा आणि आकाशाचं आयुष्य कोणतं वळण घेत याची हृदयस्पर्शी कथा या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. वैवाहिक आयुष्यातील समस्या, मुला-मुलींच्या अपेक्षा, त्यांच्या आई-वडिलांचे दृष्टिकोन यासोबत समाजाची मानसिकता या सगळ्यांवर चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.

दिग्दर्शनासोबतच कथा, पटकथा, संवादलेखन आणि गीतलेखनही व्यवहारे यांनीचं केलं आहे. या गीतांना संगीतकार एँग्नेल रोमन यांचा संगीतसाज लाभला आहे. वैशाली माडे, सुहास सावंत, प्रसन्नजित कोसंबी यांनी यातील गीते गायली आहेत. संगीत संयोजन विलास गुरव यांचे आहे. विक्रम गोखले आणि यतिन कार्येकर यांच्या जोडीला या सिनेमात सुरेश विश्वकर्मा, सुनील गोडबोले, भक्ती चव्हाण, श्वेता खरात, सुवर्णा काळे, रितेश नगराले, राहूल पाटील, हर्षा शर्मा, अर्जुन जाधव, शंकर सूर्यवंशी हे कलाकार आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते अभय भंडारी, प्रमोद वेदपाठक, सुभाष चव्हाण, औदुंबर व्यवहारे असून सहदिग्दर्शन निशांत आडगळे यांनी केले आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *