Breaking News

हत्तींचं संरक्षण म्हणजे पुण्यकर्म गायिका कनिका कपूरचे मत

मुंबई : प्रतिनिधी

अलिकडच्या काळात सेलिब्रिटीजचा उपयोग जनजागृतीसाठी करून जनमानसांच्या मनामध्ये समाजहितोपयोगी भावना जागृत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. याचे चांगले परिणामही दिसत आहेत. पर्यटनापासून प्रदूषण मुक्तीपर्यंत बऱ्याच आघाड्यांवर आघाडीच्या विविध सेलिब्रिटीज जनजागृती करण्याचं काम करीत आहेत. अशा सेलिब्रिटीजच्या पंक्तीत गायिका कनिका कपूरही विराजमान झाली आहे. हत्ती वाचवण्याच्या मोहिमेत कनिकाने स्वत:ला झोकून दिलं आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असलेली गायिका कनिका कपूर नेहमीच विविध समाजकार्यांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी बकिंघम पॅलेसमध्ये प्रिन्स चार्ल्स आणि कॅार्नवॅाल कुटुंबियांच्या उपस्थितीत गायन केल्याने कनिका पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली होती. प्राण्यांबद्दल आपुलकीची भावना असणाऱ्या कनिकाने आता हत्तींचा बचाव करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पशुप्रेमी असलेल्या कनिकाने नेहमीच विविध प्रकारच्या प्राण्यांच्या कल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला आहे.

एलिफंट एनजीओच्या वतीने कनिकाला एलिफंट फॅमिली चॅरीटी डिनरसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. ही संस्था देशभरातील हत्तींच्या कल्याणासाठी कार्य करते. एलिफंट फॅमिली – प्रोटेक्टिंग एशियन एलिफंट्स अॅण्ड थेअर हॅबिटेटची स्थापना मार्क शँड यांनी केली होती. ब्रिटिश पर्यटक लेखक असणाऱ्या मार्क यांनी आशियायी हत्तींच्या संवर्धनासाठी कायम पुढाकार घेतला होता. एलिफंट फॅमिटीची स्थापनाही त्यांनीच केली होती. मार्क यांच्या पश्चात त्यांची बहिण कॅमिला आणि प्रिंस चार्ल्स यांच्या पत्नीने लुप्त पावणाऱ्या हत्तींचा बचाव करण्यासाठी मदतकार्य सुरू केलं. या कामात आता त्यांना ब्रिटिश आशियायी ट्रस्टची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असणाऱ्या कनिकाचीही साथ लाभली आहे.

हत्तींच्या बचावासाठी कार्य करताना एक वेगळंच समाधान लाभत असल्याचं कनिका मानते. हत्तींच्या बचावासाठी कार्य करण्याची हीच अचूक वेळ आहे. याबाबत जनमानसात वेळीच जागरुकता निर्माण केली गेली नाही तर त्याचे भविष्य म्हणजे पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही असंही कनिका मानते. हत्तींचं संरक्षण करणं हे पुण्यकर्म असल्याचंही कनिकाचं मत आहे. यासाठी प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून एनजीओसाठी देण्यात येणाऱ्या एका एलिफंट स्टॅच्यूचं डिझाइनही ती तयार करणार आहे. नंतर या स्टॅच्यूचा लिलाव करून त्यातून येणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग हत्तींच्या संवर्धनासाठी करण्यात येणार असल्याचं समजतं.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *