Breaking News

विजय कदमांच्या ‘खुमखुमी’ने सर केली चेन्नई तामीळनाडूतही मराठी नाटकाची सोडली छाप

मुंबई : प्रतिनिधी

विजय कदम हे नाव आठवताच सहजसुंदर अभिनय करणारा एक हसऱ्या कलाकाराचा चेहरा अनाहुतपणे समोर येतो. अलिकडच्या काळात कदम चित्रपटांपासून थोडे दूर गेले असले तरी रंगभूमीवर मात्र सक्रियपणे कार्य करीत आहेत. आजही त्यांच्या गाजलेल्या नाटकांच्या तसेच कार्यक्रमांच्या आठवणी नाट्यरसिकांच्या मनात ताज्या आहेत. यापैकीच एक असणाऱ्या ‘खुमखुमी’ची यशस्वी चौफेर घोडदौड वर्तमान काळातही सुरू आहे. कदमांच्या ‘खुमखुमी’ने नुकतंच चेन्नई सर करत तिथल्या मराठी बांधवांना हास्याची मेजवानी दिली.

चेन्नई येथील मराठी मंडळाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘खुमखुमी’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. निखळ हास्याची मेजवानी देणाऱ्या कदम यांच्या आगळ्या वेगळ्या ‘खुमखुमी’ला चेन्नईतील महाराष्ट्रीयन प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. चेन्नईतील भरगच्च सभागृहात मराठी रसिकजनांनी या रंगतदार मराठमोळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत वृक्षारोपणाचा कार्यक्रम ही यावेळी पार पडला. नवचैतन्याची गुढी उभारत सुरु झालेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर चांगलाच रंगत गेला. श्रीखंड पुरीच्या लज्जतदार मराठी मेजवानीने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘खुमखुमी’ कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी चेन्नईतील मराठी मंडळ उत्साहाने सहभागी झालं होतं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदार फडके, आशुतोष आपटे, चेन्नईच्या मराठी मंडळाचे अध्यक्ष समीर गद्रे यांचे विशेष सहकार्य लाभलं. ‘खुमखुमी’ची ताकद काय आहे ही देश-विदेशातील प्रेक्षकांनी अनुभवली असून गुढीपाडव्याच्या निमित्ताने चेन्नईवासियांनाही याची चव चाखता आल्याने एक वेगळंच समाधान लाभल्याचं कदम म्हणाले. यापुढेही देशभरातील विविध राज्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या मराठी बांधवांसाठी ‘खुमखुमी’चे प्रयोग करण्याचा आपला मानसही कदम यांनी बोलून दाखवला. यासाठी स्थानिक पातळीवरील मंडळांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं मतही कदम यांनी व्यक्त केलं.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *