Breaking News

बाहुबलीसोबत जमली पूजाची जोडी आता प्रभास सोबत पूजाचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी

पूजा हेगडे हे नाव यापूर्वी निर्माता-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुचर्चित ‘मोहेंजो दारो’ या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलं. पदार्पणताच ऋतिक रोशनसारख्या आघाडीच्या अभिनेत्यासोबत जोडी जमवत पूजाने रसिकांवर जादू करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खरा, पण चित्रपटाला आलेल्या अपयशामुळे तिला त्याचा फारसा फायदा झाला नाही. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहेंजो दारो’नंतर पूजा पुन्हा दक्षिणात्य चित्रपटांकडे वळली आणि पूजाच्या करियरचा ग्राफ खऱ्या अर्थाने गगनभरारी घेऊ लागला. गत वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘डीजे’ (दुव्वदा जगन्नाधम) या तेलुगू चित्रपटाने पूजाला टॅालिवुडमध्ये एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचं काम केलं. या चित्रपटाला मिळालेल्या यशासोबतच बॅालिवुडमध्येही तिचे स्टार चमकू लागले. रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘रेस ३’ या सिनेमामध्ये झळकणार असल्याने पूजा बॅालिवुडमध्ये पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आली. आता पूजाची जोडी ‘बाहुबली’ फेम प्रभाससोबत जमल्याची बातमी आली आहे.

‘डीजे’ला मिळालेल्या यशामुळे पूजाच्या घरासमोर टॅालिवुडमधील सिनेनिर्मात्यांची जणू रांग लागली आहे. पूजाला आपल्या सिनेमासाठी साइन करण्यासाठी बरेच निर्माते मोठी रक्कम मोजायलाही तयार असल्याचं बोललं जात आहे. दक्षिणात्य दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांनी आपल्या आगामी सिनेमात प्रभाससोबत काम करण्यासाठी पूजाला साईन केलं आहे. यूवी क्रिएशन्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जुलै अखेरीस सुरुवात करण्याची योजना आखण्यात आली आहे. २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

‘मोहेंजो दारो’ या सिनेमाने पूजाला बॅालिवुडमध्ये एंट्री करण्याची संधी दिली. त्यानंतर आलेल्या ‘डीजे’ने पूजामधील अभिनेत्रीचं दर्शन घडवण्याचं काम केलं. यामुळेच आज तिची जोडी प्रभाससोबत जमली आहे. इतकंच नव्हे तर पूजा लवकरच महेशबाबू आणि ज्युनियर एनटीआर या आघाडीच्या दक्षिणात्य अभिनेत्यांसोबतच दिसणार आहे. याखेरीज पूजाच्या काही सिनेमांची घोषणा अद्याप व्हायची आहे.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *