Breaking News

अमजद अली खान, आशा भोसले, अनुपम खेर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर प.हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर यांची पत्रकार परिषदेत माहीती

मुंबई : प्रतिनिधी

मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या स्मृती प्रित्यर्थ मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा आज प्रभुकुंज येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली. ज्येष्ठ पार्श्वगायक-संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अमजद अली खान, आशा भोसले, अनुपम खेर यांच्यासह विविध क्षेत्रांमधील दिग्गजांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित करण्यात आले.

मागील ७५ वर्षांपासून म्हणजेच १९८८ पासून संगीत, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, पत्रकारिता आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरव करण्यात येतो. या वर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर २०१८ हा पुरस्कार सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांना देण्यात येणार असून, मंगेशकरांच्याच कन्या असलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अनुपम खेर यांना त्यांच्या भारतीय थिएटर आणि चित्रपटातील कामगिरीबद्दल, शेखर सेन यांना त्यांच्या थिएटरमधील योगदानाबद्दल आणि धनंजय दातार यांना त्यांच्या सामाजिक उद्योजकतेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे साहित्यिक कवी योगेश गौर यांना वाग्विलासिनी पुरस्कार तर राजीव खांडेकर यांना त्यांच्या पत्रकारितेबद्दल श्रीराम गोगटे पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून ‘अनन्या’ या नाटकाला मोहन वाघ पुरस्कार बहाल करून गौरविण्यात येणार असून सेंट्रल सोसायटी ऑफ एजुकेशनच्या अध्यक्षा माननीय मेरी बेल्लीहोंजी यांना बधिरांसाठीच्या त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि सामान्य लोकांमधील बधिरांच्या प्रगतीसाठी करत असलेल्या कामगिरीबद्दल आशा भोसले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

२४ एप्रिल रोजी मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. याच सोहळ्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचेही वितरण करण्यात येते. या वर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१८ या सोहोळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.

हा पुरस्कार सोहोळा पार पडल्यानंतर शास्रीय संगीतावर आधारित ‘स्वर नृत्य भाव दर्शन’ या कार्यक्रमांतर्गत पंडित बिरजू महाराज आणि सास्वती सेन कथ्थक नृत्याविष्कार सादर करतील. पंडित अजय चक्रवर्ती ठुमरीचे वेगवेगळे प्रकार सादर करणार असून, त्यांना तबल्यावर साथ करणार आहेत अनिंदो चॅटर्जी. त्याचप्रमाणे अनिंदो चॅटर्जी यांचा तबला वादनाचा सोलो परफॉर्मन्स, पंडित अजय चक्रवर्ती यांच्या ठुमरी आणि पंडित बिरजू महाराजांच्या भावविष्काराने रंगणार आहे. हृदयेश आर्ट्सतर्फे हा संगीत मैफिलीचा कार्यक्रम आयोजित केला जात असून मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान व हृदयेश आर्ट्सद्वारे या सोहोळ्याचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. २४ एप्रिल २०१८ रोजी सायन येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये सायंकाळी ६:१५ वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *