Breaking News

आता मी नवरी बनणार नाही चित्रपट अभिनेत्री कृती खरबंदाचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी

तेलुगू, तमिळ, कन्नड भाषांमधील जवळपास १५ सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यानंतर हिंदीत स्थिरस्थावर होऊ पाहणारी अभिनेत्री कृती खरबंदा पुन्हा एकदा नवरीच्या रूपात दिसणार आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राज : रीबूट’ या चित्रपटाद्वारे बॅालिवुडमध्ये दाखल झालेली कृती ‘वीरे दी वेडींग’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कृतीने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी दिलखुलास गप्पा मारल्या…

……………………………..

बॅलिवुडमध्ये पदार्पण केल्यानंतरही कृतीने हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ताळमेळ साधत आपल्या करियरला आकार देण्याचं काम केलं. कृतीने आजवरच्या करियरमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये वधूची भूमिका साकारली आहे. शीर्षकावरून हा चित्रपटही लग्नाचीच गोष्ट सांगणारा असेल असं वाटतं. याबाबत विचारलं असता कृती म्हणाली, “खरं आहे. एका वर्षात मी सात वेळा वधूची म्हणजेच नवरीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे कदाचित मी लग्नाची ब्रँड अॅम्बेसेडरच आहे की काय असं मला वाटू लागलंय. प्रेक्षकांनी मला त्याच रूपात स्वीकारलं असलं तरी कलाकार म्हणून मला विविधांगी भूमिका साकारायच्या आहेत. एकाच साचेबद्ध भूमिकेत बंदिस्त व्हायचं नाही. आजही मला लग्नावर आधारित असलेल्या चित्रपटांमध्ये नवरीची भूमिका साकारण्याच्या ऑफर्स येत आहेत. मी आता नवरी बनणार नाही असं निक्षून सांगत मी काही चित्रपट नाकारलेही आहेत.”

प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याची इच्छा असतेच, पण सर्वांनाच संधी मिळते असं नाही. तुला कशा प्रकारच्या भूमिका साकारण्याची इच्छा आहे, असं विचारताच कृती म्हणाली, “हा खूप चांगला प्रश्न आहे. एक तर मी कलाकार असले तरी मला स्वत:ला कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत बंदिस्त व्हायचं नाही. अभिनयाचा कस लावणारी कोणत्याही प्रकारची व्यक्तिरेखा मी साकारायला तयार आहे. वेळ प्रसंगी नकारात्मक भूमिका साकारायला मी घाबरणार नाही. मला परफॅार्मर म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करायची आहे. जगातील सर्वात उत्तम दिग्दर्शक आणि कलाकारांसोबत काम करण्याचं सर्वच कलाकारांचं स्वप्न असतं. माझंही ते आहेच, पण पिरीयड फिल्म्स करण्याची माझी इच्छा आहे. संधी मिळाली तर श्रीराम राघवनसारख्या प्रयोगशील दिग्दर्शकांसोबतही काम करायचं आहे.”

‘वीरे दी वेडींग’ या चित्रपटात खरोखर काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाली का? या प्रश्नाचं उत्तर सावधगिरीने देत कृती म्हणाली, “होय. या चित्रपटात मी साकारलेल्या व्यक्तिरेखेत मला एक वेगळंच आव्हान जाणवलं. त्यामुळेच हा चित्रपट स्वीकारला. यात मी गीत नावाच्या तरुणीची भूमिका साकारली आहे. ‘जब वी मेट’ या चित्रपटात करीना कपूरने साकारलेली गीत मला खूप भावली होती. त्यामुळेच ही भूमिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या व्यक्तिरेखेचं केवळ नाव करीनाने साकारलेल्या भूमिकेशी मिळतंजुळतं आहे. त्या गीतशी या गीतचा तीळमात्रही संबंध नाही. या व्यक्तिरेखेबाबत तसंच कथानकाबाबत यापेक्षा अधिक काही सांगू शकणार नाही.”

‘वीरे दी वेडींग’मध्ये कृतीची जोडी पुलकित सम्राटसोबत जमली आहे. या चित्रपटात कृतीने गीत, तर पुलकितने वीर ही व्यक्तिरेखा साकारली आहे. पुलकितसोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव होता. जो प्रेक्षकांनाही हा चित्रपट पाहताना येईल असं कृती मानते. हा सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन असून, उपदेशाचे डोस पाजणारा नसल्याचं मत कृतीने व्यक्त केलं. सध्या ‘वीरे दी वेडींग’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या कृतीचा ‘यमला पगला दीवाना फिर से’ हा चित्रपट पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *