Breaking News

केंद्रात शेतकऱ्यांचे नाही तर सुटबुटवाल्यांचे सरकार शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

मुंबई: प्रतिनिधी

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विषयक विधेयकाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. ही विधेयके शेतकरी विरोधी असून ते रद्द केले पाहिजेत अशी भूमिका असून या विधेयकाच्या विरोधात देशभरात काँग्रेस पक्ष आंदोलन करत आहे. कोणाशीही चर्चा न करता शेतकरी विरोधी कायदे लादणारे केंद्रातील भाजप सरकार हे जनसामान्यांचे, शेतक-यांचे नसून फक्त सूट बूटवाल्यांचे आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

काँग्रेस पक्षाने कृषी कायद्याविरोधात राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावेत या मागणीचे निवेदन दिले. यावेळी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, खा. सुरेश धानोरकर, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, अनिस अहमद, आ. कुणाल पाटील, आ. सहसराम कोरोटे, आ. मोहनराव हंबर्डे , आ.राजेश राठोड, अमरजित मन्हास, रविंद्र दळवी, प्रवक्ते अतुल लोंढे, सुशीबेन शाह, आदी उपस्थित होते. त्यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेतकरी विरोधी विधयके आणणा-या केंद्र सरकारचा निषेध केला.

केंद्राने घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. विधेयक संशोधनासाठी संसदीय समितीकडे पाठवावे असा आमचा आग्रह होता. किमान पक्षी भाजपने आपला मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाशी याबाबत चर्चा करायला हवी होती, मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करायला हवी होती पण त्यांनी ते ही केले नाही. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं मोदी म्हणाले होते पण शेतक-यांना सध्या हमीभावही मिळत नाही. हा काळा कायदा पुन्हा सरकारला पाठवून फेरविचार करायची मागणी आम्ही आज राज्यपालांकडे केली आहे. याबाबत केंद्राशी चर्चा करू असं आश्वासन राज्यपालांनी दिलं आहे.  या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल असेही ते म्हणाले.

या आंदोलनाचा पुढच्या टप्प्यात २ ऑक्टोबर हा दिवस किसान मजदूर बचाओ दिवस म्हणून साजरा करण्यात येणार राज्यातील सर्व जिल्हा व विधानसभा मुख्यालयाच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकार मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के पाटील कोरोनाबाधीत झाले आहेत, ते शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रोजी मुंबई दौ-यावर आले होते. यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर मंत्र्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यपालांची भेट घेतली नाही.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *