Breaking News

अनुदानाच्या नावाखाली शेतकऱ्यांची चेष्टा लावलीय का ?

निर्धार परिवर्तन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचा सवाल

नाशिक-दिंडोरी : प्रतिनिधी

कांद्याला २०० रुपये देवून काय होतं… क्विंटलला २०० रूपये देता… काय चेष्टा लावलीय का… शेतकऱ्यांना झालेल्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करु नका असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिंडोरी येथील जाहीर सभेत दिला.

साडेचार वर्षांत भाजप आणि सेनेच्या सरकारने जनतेला गाजरं दाखवण्याचे काम केले जात आहे. माझ्या शेतकर्‍यांच्या घरात आर्थिक सुबत्ता यावी. परंतु ही सुबत्ताच गायब करण्यात येत आहे. दुष्काळाचे सावट राज्यावर आहे. परंतु दुष्काळग्रस्त भागात टँकर दिले जात नाहीय. याबाबतचा अदयाप जीआर निघाला नाही. कशी मिळणार मदत असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.

नारपारचे पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे यासाठी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करत आहे. १०० टीएमसी पाणी गुजरातला दिले जात आहे. गुजरात आपलेच राज्य आहे. परंतु आम्ही उपाशी… हे चालणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचा आरोपही त्यांनी केला.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले नाही. हे सरकार फक्त घोषणाच करते. कृती काहीच करत नाही. यांनी राज्यावर ५ लाख कोटी कर्जाचा डोंगर उभा केल्याचा आरोप केला.

राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. भाजप- सेनेचे खरं रुप जनतेसमोर परिवर्तन यात्रेमध्ये मांडत असल्याने त्यांची सुरक्षा कमी केली. तुम्हाला आर्थिक सुबत्ता आणायची असेल, तुमच्या कांद्याला, ऊसाला, तुमच्या सर्वच समस्या सोडवायच्या असतील आणि तुमची राहिलेली सर्व कामे पूर्ण करायची असेल तर राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे रहा तुमची सर्व कामे करून देईन असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 

सरकार बारदाने खरेदी करत नसेल तर त्यांचे बारदान करा -छगन भुजबळ

या सरकारला एवढी भीक लागलीय की, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, घोटी या परिसरात भात हे मुख्य पीक आहे परंतु या भात पीकासाठी बारदाने खरेदी करायला पैसे या सरकारकडे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे भातपीक उचलले गेले नाही. हे सरकार नुसते विकासाच्या गप्पा मारतेय. अरे अगोदर बारदाने खरेदी करा. आता यांनी बारदाने खरेदी केली नाहीत तर यांचे बारदान करुन टाका असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनी दिंडोरीच्या जाहीर सभेत केला.

नारपारच्या पाण्याचा एक थेंबही गुजरातला देणार नाही. भले शहीद झालो तरी हा लढा सोडणार नाही. या बिनकामी सरकारला शिकवा धडा आणि परिवर्तनाच्या माध्यमातून या सरकारला खड्डयात गाडा असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

संविधानाच्या गाभ्याला हात घातला जातोय -जितेंद्र आव्हाड

किती लेबल लावणार आहात, किती विद्वेष पसरवणार आहात. संविधानच्या गाभ्याला हात लावण्याचे काम मोदी सरकार करत आहेत. संविधान जाळण्याचे काम या व्यवस्थेत केले गेले असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. 

न्याय मिळत नाही मग न्याय मागायचा कुणाकडे. बोलघेवडे लोक या राज्य आणि केंद्रात आहेत. २०१४ चा खोटारडा प्रचार आज आपल्याला भोगावा लागतो आहे. जोपर्यंत यांची सत्ता जात नाही तोपर्यंत यांच्या तोंडाला फेस आणणारा कांदा चेपल्याशिवाय थांबू नका असे सांगत मोदी-फडणवीस यांच्या पासून महाराष्ट्र वाचवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Check Also

मेट्रो कारशेड जागाबदलासाठी नवीन समितीचा निव्वळ फार्स, अहवाल आधीच तयार! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी मेट्रो-3च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी आधीच अहवाल तयार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *