Breaking News

जय मल्हार’नंतर देवदत्तचा ‘चेंबूर नाका’ एका दमदार भूमिकेत दिसणार देवदत्त

मुंबई : प्रतिनिधी

काही कलाकार केलेल्या कामांमुळे ओळखले जातात. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांचा ठसा रसिकांच्या मनावर असा काही उमटतो की, प्रेक्षक त्यांना पुन: पुन्हा नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यासाठी आतुरतात. झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेत खंडेरायांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता देवदत्त नागे यांनी प्रेक्षकांवर अशी काही जादू केली की, अवघ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर परदेशात वसलेला मराठमोळा प्रेक्षकही त्यांच्या अभिनयावर फिदा झाला. हेच देवदत्त नागे सध्या काय करत आहेत? हा प्रश्न अनेकांना सतावत होता. या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून लवकरच ते एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

साक्षी व्हिजन प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनणाऱ्या निर्माता डॉ. सीमा नितनवरे यांची निर्मिती असलेल्या ‘चेंबूर नाका’ या आगामी मराठी चित्रपटात देवदत्त एका नव्या रूपात मराठी रसिकांना दिसणार आहे. ‘चेंबूर नाका’ या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या वेगात सुरू आहे. मराठी मालिका विश्वातील मैलाचा दगड ठरावी अशी ‘जय मल्हार’ ही मालिका केल्यानंतर खंडेराया नेमक्या कोणत्या रूपात समोर येणार हे कोडं देवदत्तच्या चाहत्यांना पडलं होतं. याच कारणामुळे देवदत्त यांनही अगदी निवडक चित्रपटांना प्राधान्य देत ‘चेंबूर नाका’हा एका आगळ्या वेगळ्या विषयावरील चित्रपट निवडला आहे. या चित्रपटात देवदत्त यांनी दत्ता नागरे नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘जय मल्हार’नंतर पुढे काय? हा प्रश्न इतरांप्रमाणे देवदत्त यांच्यासमोरही होता, पण येणारा प्रत्येक सिनेमा न स्वीकारता राजहंसाप्रमाणे चोखंदळ राहात त्यांनी आशयघन चित्रपटांचा स्वीकार करीत दिग्दर्शक नितेश पवार यांच्या ‘चेंबूर नाका’ची निवड केली. या चित्रपटाच्या विषयासोबतच त्यातील धडाकेबाज व्यक्तिरेखा भावल्याचं देवदत्त मानतात. आजच्या काळातील प्रेक्षकांना प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळं, पण वास्तवतेचं भान राखणारं हवं असल्याचं देवदत्त यांचं मत आहे. ‘चेंबूर नाका’ हा चित्रपट याच वाटेने जाणारा असल्याने त्याला नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता असंही देवदत्त म्हणतात. या चित्रपटातील सहकलाकारांची टिमही आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय देण्यासाठी सक्षम असल्याने काम करताना समाधान लाभत असल्याचं देवदत्त यांचं म्हणणं आहे.

दिग्दर्शक नितेश पवार यांनी ‘सोपान’ या चित्रपटाद्वारे रसिकांच्या मनावर आपल्या कामगिरीचा अमीट ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. पदार्पणातील चित्रपटामध्ये अपार यश मिळवल्यानंतर ‘चेंबूर नाका’ या चित्रपटात नितेश पुन्हा एकदा एक आव्हानात्मक विषय हाताळत आहेत. या चित्रपटाची पटकथा नितेश यांनी समध खान यांच्या साथीने लिहिली आहे. याशिवाय बिपीन धायगुडे यांच्यासोबत त्यांनी ‘चेंबूर नाका’चं पटकथा लेखनही केलं आहे. गीतकार गुरू ठाकूरने लिहिलेल्या गीतांना संगीतकार अमितराज यांनी स्वरसाज चढवला आहे. देवदत्तसोबत या चित्रपटात विद्याधर जोशी, संजय खापरे, उषा नाडकर्णी, मिलिंद शिंदे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *