Breaking News

माजी गृहमंत्री देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत सीबीआयचे धाड सत्र इतरांवरही गुन्हा दाखल

मुंबई: प्रतिनिधी

१०० कोटी रूपयांच्या खंडणी वसुली करण्यास सांगितल्याचा खळबळजनक आरोप माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावे लागलेल्या अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हे दाखल केले असून त्यांच्या घरावर धाडसत्र टाकल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर देशमुख यांच्यासह इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असून इतर ठिकाणीही झाडाझडती घेण्यात आली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाला. त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंग यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंग यांनी आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवित एकच खळबळ उडवून दिली.

या प्रकरणी परमबीर सिंग यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. परंतु न्यायालयाने परमबीर सिंग यांची याचिका फेटाळून लावत याचप्रकरणात अॅड.जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर प्राथमिक तपासाचे आदेश देत १५ दिवसाचा कालावधी देत सदरचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला. तसेच सीबीआयने याप्रकरणी अनेकांचे जबाब नोंदविली. त्यानंतर थेट गुन्हा नोंदवून धाड सत्र सुरु केल्याचे वृत्त सकाळी बाहेर आले.

दरम्यान सीबीआयने तपासाचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला की नाही याबाबत कोणतीही माहिती पुढे आली नाही.

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील संबंधित इतरांविरुद्ध गुन्हे दाखल केले. गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने अनिल देशमुखांच्या घर व कार्यालयांसह १० ठिकाणी छापेमारी केली आहे.

देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्याचीही सीबीआयने झाडाझडती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. रात्री उशिरा सीबीआयच्या पथकाने छापेमारी केली आणि पहाटे हे पथक निघून गेल्याचं समजते. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं वृत्त असून, इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले आहेत. सीबीआयकडून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं वृत्त आहे. देशमुख यांच्या नागपूरातील निवासस्थानीही सीबीआयने छापा टाकला असून, घराची झाडाझडती सुरू आहे.

सीबीआयने काही महत्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत. त्यासोबतच प्रिंटर देखील नेले आहे. सुखदा निवासस्थानातील दहाव्या मजल्यावर देशमुख राहतात. या ठिकाणी सीबीआयचे अधिकारी पोचलेले असून, घराची झाडाझडती घेतल्याचे समजते.

Check Also

राहुल गांधी यांची २४ एप्रिलला अमरावती व सोलापुरात जाहीर सभा

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघात काँग्रेस नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *