Breaking News

भंडारा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश मृत बालकांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत

मुंबई : प्रतिनिधी

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

या दुर्घटनेनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी असून कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना व्यक्त करत या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. रात्री ड्युटीवर असलेल्या नर्स व वॉर्ड बॉय यांनी तातडीने खिडक्या, दरवाजे उघडली. या कक्षाच्या लगतच्या दुसऱ्या वॉर्डमधील बालकांना त्यांनी तातडीने हलविल्याने ७ बालकांना वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेमुळे १० बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांचा आगीत होरपळून तर अन्य सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला आहे.

याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही यासाठी दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *