Breaking News

वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यात झोल मुंबईतील ९२७ खड्डे बुजवायला ४८ कोटी?-भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई: प्रतिनिधी
मुंबईतील सुमारे २ हजार किमी च्या रस्त्यावर केवळ ९२७ खड्डे आहेत असे महापालिका सांगते आहे. मग खड्डे भरण्यासाठी जे ४८ कोटींची तरतूद केली ती याच ९२७ खड्यांसाठी का? असा उपरोधिक सवाल करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यात झोल असा टोला लगावला.
मुंबईतील खड्डे हा विषय सध्या गाजत असून भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी या विषयावर आज भाष्य करीत पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निषाणा साधला.
मुंबई महापालिकेने खड्ड्याबाबत जे पोर्टल तयार केले त्यावर केवळ ९२७ खड्डे असल्याचे नमूद झाले आहे. महापालिका दररोज नवी हसवणूकीची स्पर्धाच करते आहे असे चित्र आहे. केवळ खड्डे बुजवण्यासाठी ४८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला मग तो या ९२७ खड्यांसाठीच होता का? असा सवाल करत यामध्ये मोठा भ्रष्टाचार असून त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीत सत्य समोर येईलच असे ते म्हणाले.
मुंबईच्या महापौरांना आमचा सवाल आहे की, पूर्ण मुंबईचे, संपूर्ण क्षेत्रफळ तुमच्या डोळ्यांसमोर कधी असतं का? संपूर्ण मुंबईचा नकाशा विकासासाठी कधी तुम्ही पाहता का ? याचं कारण नवीन फूटपाथ करायचा विषय आला की फक्त वरळी.. सिग्नल आणि लाईटचे खांब सुशोभित करायचे असतील तर वरळी.. मुंबईत सर्वत्र ब्रिज आहेत. पण पुलाच्या खाबांचे सुशोभीकरण फक्त वरळीत होते.. आता थ्रीडी मॅपिंग करायचे आहे, तर ते पण वरळीत.. कोविड सेंटर बनवायचे असेल तर तेही वरळीत.. आणि पाण्याचा निचरा करणारे पंप बसवायचे असतील तर मग कलानगर… वरळी आणि कलानगर पलिकडे मुंबई आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला.
मंत्री राजेश टोपे यांच्या खात्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी
मंत्री राजेश टोपे यांनी माफी मागून प्रकरण संपणार नाही, आपल्या कृत्यावर, पापांवर माफी मागितली म्हणजे पडदा पडणार नाही. ज्या आमच्या विद्यार्थ्यांची ही संधी हुकली त्यांनी केलेली मेहनत, कुटुंबाचा त्याग आणि त्यानंतर त्यांचे झालेले नुकसान याला आरोग्य खाते जबाबदार आहे. काही दलालांना आधीच प्रश्न पत्रिका कशी मिळाली? ती ठराविक लोकांपर्यंत कशी पोहचते? पोलिस यंत्रणा याबाबत कसे काही कळत नाही ? हा सत्तेचा दुरुपयोग नव्हे का? त्यामुळे माफी मागायची आणि पळ काढायचा असे करता येणार नाही. राजेश टोपे यांच्या खात्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, रामशास्त्री प्रभुणे यांची भूमिका माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी अशी अपेक्षा आहे, अशा शब्दांत खोचक शब्दात शेलार यांनी टीका केली.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *