Breaking News

छ.शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून ५० टक्के शेतकरी वंचित एकवेळ समझोता योजना म्हणजे धुळफेक असल्याचा काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी
८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी हा भाजप शिवसेना सरकारचा दावा पूर्णपणे खोटा ठरला असून या कर्जमाफीतून ५० टक्के शेतकरी वंचित राहिल्याने शेतक-यांना न्याय देण्यात ही योजना पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतक-यांचा प्रचंड पुळका आल्याचे दाखवून शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केली. त्याला आता २७ महिने झाले असून ही योजना देशातील सर्वात मोठी कर्जमाफीची योजना असेल असे मुख्यमंत्र्यांनी फार गाजावाजा करीत जाहीर केले होते. परंतु सातत्याने कमीत कमी शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळेल हाच या सरकारचा कटाक्ष राहिला असल्याचे या योजनेची अंतिम आकडेवारी समोर आल्यानंतर दिसून आल्याचा आरोप करत योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून लाखो शेतकरी वगळले गेल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत एकूण ४४ लाख ४ हजार १४७ शेतक-यांच्या खात्यामध्ये १८ हजार ७६१ कोटी ५५ लक्ष रूपये जमा करण्यात आले आहेत. याचाच अर्थ जवळपास ४५ लाख शेतक-यांना अजूनही लाभापासून वंचित ठेवण्यात आले असून कर्जमाफीच्या रकमेचा आकडाही ५० टक्क्यांच्या आसपासच असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याचबरोबर एकवेळ समझोता योजना ही धूळफेक असल्याचा काँग्रेस पक्षाचा आरोपही सत्य ठरला आहे. या योजनेत केवळ ४ लाख २६ हजार ५८८ शेतक-यांना २ हजार ६२९ कोटी रूपये देण्यात आले आहेत. यामध्येही जवळपास ६ लाख पात्र शेतक-यांना या योजनेचा लाभच मिळाला नाही. शासनातर्फे १० लाख ४४ हजार २७९ शेतक-यांना ७ हजार २९० कोटी देण्यात येतील असे निर्धारीत करण्यात आले होते.
आश्चर्याची बाब म्हणजे शासनाने अधिकृत पात्र शेतक-यांची ग्रीन लिस्ट जाहीर केली, त्यात एकूण कर्जमाफी ही ५५ लाख ६० हजार ८१६ शेतक-यांकरिता २६ हजार ४५६ कोटी ६९ लक्ष रूपयांची होती. या यादीचा अर्थ हा की अधिकृतपणे ८९ लाखांपैकी जवळपास ३४ लाख शेतक-यांना कर्जमाफीतून वगळण्यात आलेले आहे. व आतापर्यंत केवळ ४४ लाख ४ हजार १४७ शेतक-यांच्या खात्यामध्ये १८ हजार ७६१ कोटी ५५ लक्ष रूपये जमा झाल्याने ११ लाख शेतक-यांना अधिकृत पात्र घोषीत करूनही जवळपास ८ हजार कोटींची कर्जमाफी मिळालेली नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
हे शासनाच्या निरस व असंवेदनशील प्रवृत्तीचे निदर्शक आहे. जवळपास २७ महिने कर्जमाफीचे घोंगडे भिजत ठेवून प्रसंगी बँकांना घोटाळेबाज ठरवून वेगवेगळी कारणे दाखवून कमीत कमी शेतक-यांना लाभ मिळेल हे सरकारने पाहिले आहे. बँकांच्या घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेकडे तक्रारही केली नाही. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कर्जमाफीच्या रूपात शेतक-यांची घोर फसवणूक या सरकारने केली असून काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यावर सरसकट कर्जमाफी करेल असे आश्वासनही त्यांनी दिले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *