Breaking News

मुलींवरील अत्याचाराबाबत काँग्रेस नेत्यांचे विकृत वक्तव्य भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी
लैंगिक शोषण झालेल्या मुलींच्या पालकांना पोस्कोअंतर्गत लाखो रुपयांची भरपाई मिळणार असल्याने अधिक पालकांनी तक्रारी केल्या, असे अत्यंत विकृत व घृणास्पद वक्तव्य काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले असून आपण त्याचा निषेध करतो, असे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक यांनी मंगळवारी सांगितले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि आमदार विजय वडेट्टीवार या दोघांनीही केलेले वक्तव्य घृणास्पद, असंवेदनशील आणि महिलांचा अपमान करणारे आहे. याचा आपण महिला मोर्चातर्फे तीव्र निषेध करतो. महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या याच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांना जाब विचारणार आहेत. महिला मोर्चा काँग्रेसचा खरा चेहेरा लोकांच्या समोर आणणार असून या दोन्ही नेत्यांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे एका वसतीगृहात अल्पवयीन आदिवासी मुलींना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी तपास चालू आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक मुलींवरील अत्याचाराला वाचा फुटली व त्यांच्या पालकांनी तक्रारी दाखल केल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतीत तपासासाठी आग्रह धरला, पालकांना धीर दिला आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉस्को) कायद्याअंतर्गत मदत मिळेल असे सांगितले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींना शासनाकडून तीन लाख ते पाच लाख रुपये मदत मिळते, असे विधान पालकमंत्र्यांनी केल्यामुळे अनेक मुली व पालक पुढे येऊन अत्याचार झाल्याचे सांगू लागले. हा सुद्धा एक पब्लिसिटीचा धंदा झाला आहे. त्यावर आमदार विजय वडेट्टीवार यांनी धोटे यांचीच री ओढताना असे सांगितले की, पॉस्को अंतर्गत मदत मिळणार आहे, असे पालकमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे तक्रारींची संख्या वाढल्याचे वक्तव्य केल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार या दोघांनीही केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस पक्षाने जाब दिला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *