Breaking News

राज्यातील लाभार्थ्यांना मिळणार देशी वाणाच्या गाई

पदुमकडून शासन निर्णय जारी

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आणि इतर विभागाकडून पशुधनाचे वाटप करण्यात येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून देशी गाईंचेही वाटप करण्यात येणार आहे. दुधाळ संकरीत गाई, म्हशींच्या गट वाटप योजनेमध्ये ही या देशी गाईंचा समावेश करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.

राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत दुधाळ पशुंच्या गट वाटपाची योजना राबविण्यात येते. २०१५ पासून याबाबतच्या जुन्या योजनांऐवजी सहा, चार किंवा दोन दुधाळ गाई किंवा म्हशींचे गट वाटप करण्याची नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येते.

देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी आता या योजनेत देशी गाईंच्या गट वाटपाचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गाई या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्पादन क्षमतेच्या एचएफ, जर्सी गाई, प्रतिदिन ८ ते १० लि. दूध उत्पादन क्षमतेच्या गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर या देशी गाई, आणि प्रतिदिन ५ ते ७ लि. दुग्धोत्पादन क्षमतेच्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी या गाईंचे गट वाटप करण्यात येणार आहेत.

 प्रतिदिन ८ ते १० लि. दूध उत्पादन क्षमतेच्या सुधारित मुऱ्हा व जाफराबादी म्हशींचे वाटप करण्यात येते. वाटप करण्यात येणाऱ्या गाई व म्हशी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील असाव्या. तसेच दुधाळ गाई व म्हशी शक्यतो १ ते २ महिन्यापूर्वी व्यायलेल्या असाव्यात, असे निकषही शासन निर्णयानुसार स्पष्ट करण्यात आले आहेत.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *