Breaking News

संजय राऊत यांचे संकेत, आघाडीतल्या पक्षांना काही जागांची अदलाबदल… तिन्ही पक्षात समन्वय साधण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातही आता निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे पडघम लवकरच वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी लोकसभा निवडणूक तर आता अवघ्या एक वर्षावर येऊ ठेवली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तसेच स्थानिक पातळीवरील बैठकांना जोर आला आहे. महाविकास आघाडीतल्या पक्षांची देखील यावर चर्चा सुरू झाली आहे. तिन्ही पक्षांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला तयार केला असल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. परंतु अशा कोणताही चर्चा झाल्या नसल्याचं मविआचे काही नेते सांगत आहेत. तर नाना पटोलेसारखे नेते सांगत आहेत की, यावर केवळ प्राथमिक चर्चा झाली आहे.

महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रत्येकी १६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, मागच्या लोकसभेत म्हणजेच आताच्या लोकसभेत आमच्या १९ जागा आहेत. अर्थात उद्धवजी ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे. महाराष्ट्रात जागा वाटप करताना तीन पक्षात समन्वय साधण्यासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागेल.

खासदार संजय राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतल्या पक्षांना काही जागांची अदलाबदल करावी लागेल हे सत्य आहे. काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील हे देखील सत्य आहे. परंतु महाविकास आघाडीच्या मजबुतीविषयी कोणाला शंका असण्याचं कारण नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनादेखील असाच प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पाटील म्हणाले, आम्ही सध्या कोणताही फॉर्म्युला तयार केलेला नाही. प्रत्येक मतदारसंघात ज्यांची जिथे जास्त ताकद आहे तिथे त्या पक्षाला प्राथमिकता दिली जाईल.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *