Breaking News

दावोसवरून आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, ३३ देशांना मेल पाठवला असता तरी कळले असते… अबब! मुख्यमंत्र्यांचा दावोसमध्ये २८ तासांत ४० कोटींचा खर्च

शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून खोचक टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस दौऱ्याला गेले होते. मात्र दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांना विचारले तर ते सांगतात आम्ही मोदींची माणसे. हे सांगण्यासाठी दावोसला गेले होते का? त्यापेक्षा इथेच राहून ज्या ३३ देशांनी दखल घेतली त्या देशाच्या प्रमुखांना इथे बसून ई-मेल करून कळविले असते तरी त्यांना कळले असते असा खोचक टोला मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.

यावेळी पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा अधिकृत कार्यक्रम चार दिवसांचा होता. या कार्यक्रमावरील अंदाजे खर्च ४० कोटींएवढा झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या २८ तासांचा खर्च ४० कोटी एवढा झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मविआ सरकारच्या दावोस दौऱ्याचं वेळापत्रक वाचून दाखवत दावोसला जाऊन तुम्ही काय केलं हे समोरासमोर बसून बोलूया, असं खुलं आव्हानही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

आदित्य ठाकरे म्हणाले, दावोसमध्ये राज्य सरकारचा चार दिवसांचा कार्यक्रम होता. याचा खर्च ४० कोटी एवढा झालाय. यापेक्षाही अधिक खर्च असू शकतो. कारण तिकडे त्यांचा सर्व मित्रपरिवारही गेला होता. चार दिवसांचा खर्च ४० कोटी होत असेल तर एका दिवसाचा खर्च साडे सात कोटी ते १० कोटींच्या घरात आहे. याचाच अर्थ त्यांनी १० कोटींचा खर्च प्रत्येक दिवसाला केला आहे, असा गंभीर आरोपही केला.

आदित्य ठाकरेंनी दावोस दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. दावोसला जाताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला. साधारणपणे २ ते २.५ कोटींचा खर्च झाला असेल. हा देखील खर्च राज्यावरच आला आहे. माझा आक्षेप या चार्टर्ड विमानावर नाही. परंतु तुम्ही जेव्हा कमर्शियल विमान सोडून चार्टर्ड विमानाचा वापर करता तेव्हा त्याचा उपयोग वेळेवर पोहोचण्यासाठी करता की उशीरा पोहोचण्यासाठी करता?, असा खरमरीत सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी मविआ सरकारच्या दावोस दौऱ्याच्या वेळापत्रकाची माहिती दिली. २२ मे २०२२ रोजी आम्ही आमच्या पेव्हेलियनचं उद्घाटन सकाळी ८.३० वाजता केलं होतं. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री जेव्हा गेले तेव्हा त्यांनी उद्घाटन पहिल्याच दिवशी संध्याकाळी ६.३० ते ७ च्या सुमारास केलं. दावोसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या एक ते दोन बैठका झाल्या असतील. कारण आधीच्या बैठका त्यांच्या रद्द झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या बैठकांचं शेड्यूल आम्हाला कुठेही दिसलेलं नाही. उद्योगमंत्री आणि MIDCनेही एकही ट्वीट केलेलं नाही. MIDCचे सीईओ गेले की नाही यावर देखील शंका आहे. हा प्रकार नक्की काय आहे. हा सर्व लोकांसमोर येणं गरजेचं आहे, असेही म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा दावोसमध्ये फक्त एक ते दोन बैठका झाल्या. १६ तारखेला महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या बैठका मुख्यमंत्र्यांनी घेतल्या नाहीत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शाश्वत विकासावर भाषण दिलं. त्यांनी नेमकं काय भाषण दिलं हे मला ऐकायचं आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

एकाबाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्र्यांनी तेथील उद्योजकांशी संवाद साधल्याचे एक-दोन ट्विट दिसले. मात्र मुख्यमंत्र्यांचे शेड्युल तेथील उद्योजकांशी संवाद साधल्याचे दिसत नाही. तसेच ज्या चार कंपन्यां सामंज्यस करार करण्यात आले. त्यातील चार कंपन्या या महाराष्ट्रातीलच आहेत असे सांगत त्या कंपन्यांशी इथे मुंबईत करार केले तेच करार तेथे जाऊन पुन्हा त्यांच्याशीच करार करण्याची काय गरज होती असा सवालही केला.

आरेची झाडं कापल्यानंतर आणि जंगलातून बोगदे तयार केल्यानंतर मुंबईचा जोशीमठ करायला निघालेले मुख्यमंत्री हे शाश्वत विकासावर काय बोलले हे जाणून घेण्याची माझी उत्सुकता आहे. हे सर्व हास्यास्पद आहे, असा उपरोधिक टोलाही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

Check Also

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला

सध्या देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्स मॅनेज करता येऊ शकते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *