Breaking News

अखेर त्या वक्तव्याप्रकरणी रामदेव बाबा यांना आयोगाची नोटीस

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि काहीवेळा उटपटांग हरकतीमुळे सातत्याने चर्चेत राहणारे योगगुरू रामदेव बाबा यांनी नुकतेच ठाणे येथील एका कार्यक्रमात महिलांनी कपडे नाही घातले तरी चांगल्या दिसतात असे वादग्रस्त विधान केले. विशेष म्हणजे त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही तेथे उपस्थित होत्या. तरीही त्यांना याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतु यासंदर्भात राज्य महिला आयोगाने रामदेव बाबा यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत नोटीस पाठविली असून दोन दिवसात त्या वक्तव्याबाबत खुलासा करावा असे आदेश दिले.

शुक्रवारी रामदेव बाबांनी ठाण्यात घेतलेल्या योग शिबिरामध्ये हा सगळा प्रकार घडला. यावेळी अमृता फडणवीसांच्या उपस्थितीत रामदेव बाबांनी हे विधान केल्यामुळे त्यावरून राजकीय चर्चाही झडू लागल्या. अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्षं त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण, त्या नेहमी आनंदी राहतात. जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसाच तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे, असे रामदेव बाबा म्हणाले.

यानंतर पुढे बोलताना त्यांनी, महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर राजकिय वर्तुळात वादाला सुरुवात झाली.

या सगळ्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश आयोगाने रामदेव बाबांना दिल्याचं आयोगाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटलं आहे.

ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव यांनी महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारं अभद्र विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची तक्रार आयोगाच्या कार्यालयाला प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग या तक्रारीची दखल घेऊन रामदेव बाबांच्या विधानाचा तीव्र शब्दांत विरोध करत आहे. त्यामुळे रामदेव बाबांना पुढच्या दोन दिवसांत त्यांच्या वक्तव्याचा खुलासा करण्याचे निर्देश आयोग देत आहे, असं आयोगानं  आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

विशेष म्हणजे रामदेव बाबा यांना मराठी समजेल किंवा नाही समजेल या अनुषंगाने महिला आयोगाने जाणीपूर्वक हिंदीत ट्विट केले.

Check Also

महापारेषणच्या पडघे-कळवा उपकेंद्रात भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित

महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात आज दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ४०० के. व्ही. अति उच्च दाब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *