Breaking News

राहुल गांधी यांचे मोदींना खुले आव्हान, ५५ तास नाहीतर ५ वर्षे ईडीत बसवलंत तरी… रामलीला मैदानावरून राहुल गांधीने फुंकले रणशिंग

कोरोना नंतरच्या काळात देशातील सातत्याने वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर लावण्यात आलेली जीएसटी आणि वाढती बेरोजगारी आदी प्रश्नावरून आज नवी दिल्लीतील रामलीला मैगानावर मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून हल्लाबोल रॅली काढण्यात आली. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत आपल्या ईडी चौकशीवरून आव्हान दिले.

पंतप्रधान मोदी सातत्याने म्हणतात मागील ७० वर्षात काँग्रेसने काय दिले? पण काँग्रेसने इतकी महागाई कधी दिली नव्हती. देशाला रोजगार देणाऱ्या अर्थव्यवस्थेचा कणा भाजपाने मोडला आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले ते फक्त त्या दोन उद्योगपतींच्या पाठबळावर. त्यामुळे नरेंद्र मोदी हे फक्त या दोन उद्योगपतींसाठी काम करतात आणि ते उद्योगपतीही त्यांच्यासाठी काम करतात असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

आज देशातील सगळी प्रसारमाध्यमं या दोन उद्योगपतींच्या हातात आहेत. त्यामुळे हे दोघेच जे काही दाखवितात तेच तुम्हाला दिसते. त्याच्या पलिकडचे तुम्हाला काही बघायला मिळत नाही. या प्रसारमाध्यमांमुळे आणि दोन उद्योगपतींच्या समर्थनामुळेच मोदी हे पंतप्रधान पदावर असल्याचे ते म्हणाले.

आपणा सर्वांना या देशाला वाचवायचे आहे. आज जर आपण जागृत होवून त्यांच्या विरोधात लढलो नाही तर आपला देश हा कधीच आपला राहणार नाही. हा देश म्हणजे राज्यघटना आहे, हा देश म्हणजे कष्टकरी, गरीब, कामगारांचा देश आहे. बेरोजगारांचा देश आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा देश आहे. या देशाला पूर्वीसारखं उभे करणं आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. चीनी आक्रमणाचा विषय काढला ते आम्हाला बोलू देत नाहीत, महागाईचा विषय काढला बोलू देत नाहीत. देशातील कोणताही व्यक्ती, संघटना, राजकिय पक्ष यांना विरोधात बोलू दिलं जात नाही. कोणी नुसता विरोधात बोलायचा प्रयत्न जरी केला तरी त्यामागे ईडी लावली जाते आणि त्याचा आवाज दाबला जात असल्याचेही ते म्हणाले.

५५ तास मला ईडीच्या कार्यालयात बसवलं. तुम्ही मला ५०० तास, ५ महिने किंवा ५ वर्षे जरी मला ईडीत बसवंल तरी मी घाबरत नाही, घाबरणार नाही. पण मी मोदींना सांगू इच्छितो मी तुम्हाला घाबरत नाही. मला फरक पडत नाही. हा देश संविधान आहे. जर आपण याविरोधात उभे राहिलो नाही तर हा देश वाचणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *