Breaking News

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच कार अपघातात निधन पालघर मध्ये त्यांच्या कारला झाला अपघात

टाटा सन्सचे माजी प्रमुख तथा सर्वात तरूण उद्योजक म्हणून प्रसिध्द असलेले सायरस मिस्त्री यांचे आज कार अपघातात निधन झालं. हा अपघात पालघर येथील चारोटी येथे झाला. रस्त्याच्या दुभाजकाला त्यांची कार धडकून झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. साधारणत: दुपारी सव्वातीन वाजता त्यांच्या कारचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले की,  दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. अपघातात दोघे जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. गाडीचा क्रमांक MH-47-AB-6705 असा आहे. पुढील प्रक्रिया सध्या सुरु आहे. दुभाजकाला गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत असल्याचंही त्यांनी सांगितले.

जुन्या सहकाऱ्याने सांगितली आठवण..

ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. ते टाटा ग्रुपचे चेअरमन असताना मी त्यांच्यासोबत काम केलं होतं. बॉम्बे हाऊसमध्ये त्यांनी पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी मीच होतो. त्या चार वर्षांच्या कार्यकाळात बराचसा सहवास मला लाभला. बोर्ड बैठकीच्या दृष्टीने अनेकदा त्यांच्यासोबत भेट व्हायची. सेंट्रल बँकेचे चेअरमन टंकसाळे यांची भेट त्यांनी नाकारली होती, तेव्हा आपले बँकेसोबत पूर्वापार संबंध असून त्यांना भेट नाकारत नाही असं सांगितलं होतं. त्यांनी ते लगेच ऐकून घेतलं होतं आणि भेटण्यासाठी होकार दिला होता, अशी आठवण सायरस मिस्त्री यांचे माजी सहकारी आणि टाटाचे माजी जनसंपर्क अधिकारी योगेश जोशी यांनी सांगितली.

सुप्रिया सुळेंनी सांगितली आठवण..

सुप्रिया सुळेंनीही सायरस मिस्त्री हे किती साधे होते याच्या आठवणी सांगितल्या. ताज हॉटेलमध्ये पती सदानंद सुळे व सायरस मिस्त्री जेवायला गेले असता तिथल्या कर्मचाऱ्यांना वाटलं सदानंद हेच सायरस आहेत. ते जेव्हा म्हणाले आम्ही तुमच्या स्वागताला आलोय, तेव्हा आम्ही सांगितलं हे सदानंद आहेत व ते सायरस आहेत. इतका लो प्रोफाइल व साधा माणूस होता तो. पाणी पुरी, साबुदाणा खिचडी करा असं सांगून आमच्या घरी हक्कानं ते येत असत असं सांगताना सायरस यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर विश्वासच बसत नसल्याचे त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी वाहीली श्रध्दांजली

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

Check Also

महाराष्ट्र व गोवा राज्य उद्योग वाढीसाठी संयुक्त उपक्रम राबवणार : प्रमोद सावंत

उद्योगात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *