Breaking News

भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर, कोण तो रामदास कदम? कृतघ्न माणूस… राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याची शक्यता

शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्यान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमकपणे टीका करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका करणे आता जवळपास बंद केले असून त्यांना अनुल्लेखाने मारण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्याबाजूला आदित्य ठाकरे हे बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे समर्थक रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर देत, कोण तो रामदास कदम असा सवाल करत इतका कृतघ्न असेल असे वाटलं नव्हते अशी खोचक टीका केली.

आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ भास्कर जाधव यांनीही राज्याचा दौरा सुरु केला आहे. या दौऱ्या अंतर्गतच ते आज गुहागर येथे आले असता शिवसैनिकांनी भास्कर जाधव यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलताना कदम यांच्यावर खोचक टीका केली.

रामदास कदमांच्या विधानाबाबत विचारलं असता भास्कर जाधव म्हणाले, रामदास कदम कोण आहे? त्यांचा शिवसेना मेळाव्याशी काय संबंध आहे? रामदास कदमांसारखा कृतघ्न माणूस मी बघितला नाही. रामदास कदम सध्या ज्यापद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत, जे आरोप करत आहेत, जी भाषा वापरत आहेत, यावरून रामदास कदम इतके कृतघ्न असतील, असं मला वाटलं नव्हतं.

जेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील दसरा मेळावा झाला होता, तेव्हा रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंच्या समोर शिवसेनेचे नेते म्हणून भाषण केलं होतं. तोच दसरा मेळावा आता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होऊ नये, असं म्हणणं म्हणजे ते किती कृतघ्न आहेत. ते किती उलट्या काळजाचे आहेत, ते किती बेईमान आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय असेही ते म्हणाले.

तुम्ही संपूर्ण देशाची राजकीय परिस्थिती बघितली तर लक्षात येईल, ज्या-ज्या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, त्या-त्या राज्यात निवडणुकीपूर्वी जातीय दंगली झालेल्या आहेत. जातीय दंगली घडल्या आहेत किंवा जातीय दंगली घडवल्या आहेत. हा इतिहास आहे. शिवसेना संपवण्याचे सर्व मार्ग संपले आहेत. शेवटचा मार्ग म्हणून राज्यात कदाचित जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसा प्रयत्न पूर्वी अडीच वर्षांमध्ये झाला आहे. कारण त्यांना मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे. मुंबई महानगरपालिका जिंकायची असेल, तर राज्यात जातीय दंगली घडवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही, हे त्यांना कळून चुकलं आहे असा आरोपही त्यांनी भाजपावर केला.

उद्धव ठाकरेंचं अतिशय सौम्य आणि सभ्य नेतृत्व राज्यातील सगळ्या जाती-धर्मातील लोकांना भावलेलं आहे. मुस्लिम समाजालाही उद्धव ठाकरेंचं नेतृत्व भावलं आहे. हेच खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं दु:ख आहे. आम्ही एवढा मोठा शिवसेना पक्ष फोडला पण बाजुला फक्त ४० आमदार आले. याच्या बदल्यात प्रत्येक ठिकाणी चार लाख लोकं शिवसेनेच्या बाजूने गेली, हे चित्र आज महाराष्ट्र अनुभवतोय, त्यामुळे भारतीय जनता पार्टी असा काहीतरी उद्योग करू शकते अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *