Breaking News

छगन भुजबळांच्या प्रकृतीबद्दल विधानपरिषदेत चिंता खाजगी रूग्णालयात उपचार करण्यास परवानगी देण्याची विरोधकांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना खाजगी रूग्णालयात उपचार करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आणि सहकारी पक्षाच्या सदस्यांनी सोमवारी विधान परिषदेत लावून धरली.

आमदार कपिल पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीचा मुद्दा मांडला. भुजबळ आताही आमदार आहेत. जे. जे. रूग्णालयात तपासणीसाठी गेल्यावर त्यांना ओपीडीच्या रांगेत उभे रहावे लागते. अँजिओग्राफी, ईसीजी अबनॉर्मल आले तरी डॉक्टर त्यांना जेलमध्ये पाठवा, असे  म्हणतात. न्यायदानात जे होईल ते होईल. पण, प्रशासन काय करत आहे असा सवाल आमदार कपिल पाटील यांनी केला.

तोच धागा पकडत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळ यांना योग्य उपचार मिळत नाहीत असा आरोप केला. भुजबळ माजी मंत्री आणि विद्यमान आमदार असूनही तरीही त्यांना जे. जे. रूग्णालयात सामान्य रूग्णांच्या रांगेत उभे राहावे लागते. त्यांनी इतर मागासवर्गीय समाजासाठी दिलेले योगदान पाहता, या समाजाच्या भावनेचा विचार करता त्यांना खाजगी रूग्णालयात उपचार घ्यायची परवानगी द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. प्रशासकीय फेऱ्यात भुजबळांना संपवायचे आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला.

शेकापचे आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे जयवंत जाधव यांनीही मुंडे आणि पाटील यांच्या भूमिकेला समर्थन दिले. भुजबळ यांना नैसर्गिक न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे असे म्हणत ते भावनिक झाले.

सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला आश्वत करताना, मनात अढी ठेवून काम करणारे हे सरकार नसल्याचे सांगितले. कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेता येईल, असेही ते म्हमाले. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भुजबळ यांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात येईल का याविषयी न्यायालयाला सरकार आणि संबंधित तपास संस्थांनी विचारणा करून योग्य तो निर्णय घ्यावा असे निर्देश दिले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *