Breaking News

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या वक्तव्यातील हवा डॉ.अमोल कोल्हेंनी काढली सरंक्षणमंत्री राजनाथ सिंगाच्या वक्तव्याचा खा. डॉ.कोल्हेंनी केला निषेध

मुंबई: प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे असे सांगत केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चुकिच्या ऐकीव माहितीवर विधान केलेले असावे असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना लगावला.

तसेच केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या वक्तव्याचा खा. डॉ.अमोल कोल्हे यांनी निषेध केला.

ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना त्याचा त्रास तर होणार नाही ना अशी स्वामीनिष्ठा त्यापाठी होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ही १६७१ च्या आसपास झाल्याचे काही ऐतिहासिक कागदपत्रे दाखवून देतात. त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वास आलेले होते असा संदर्भ डॉ. कोल्हे यांनी देत संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यातील दाव्यातील हवा काढली.

आपला जाज्वल्य इतिहास हा निःपक्षपातीपणाने, तर्कसंगत पद्धतीने, अकारण कुणाचेही स्तोम माजवून एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न टाळून राज्य, देश आणि जगभरात सांगण्याची गरज आहे. दोन दिवसापूर्वीच एका हिंदी दिग्दर्शकाने मुघल शासक हे राष्ट्रनिर्माते आहेत असे सांगितले. त्यामुळे हा इतिहास सांगण्याची गरज आणखी प्रकर्षाने जाणवत आहे. केवळ निषेध किंवा एखादे आंदोलन हे क्षणिक ठरू शकते. मला वाटते ही वैचारिक लढाई आहे आणि ती त्याच माध्यमातून लढली गेली पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

साहित्य, कला याचा समाजमनावर दीर्घकालीन परिणाम होतो, त्या माध्यमातून आपण निःपक्षपाती, तर्कसंगत इतिहास जगभर पोहोचवला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *