Breaking News

मुख्यमंत्री म्हणाले, पक्षभेद विसरा- विकास कामासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा सर्वपक्षिय खासदारांच्या बैठकीत आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व खासदारांनी पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा असे आवाहन करतानाच खासदारांचे जे विषय राज्य शासनाकडे आहेत त्याबाबत विभागवार बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे राज्याचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, मुख्य सचिव संजय कुमार आदी यावेळी उपस्थित होते. कोरोनामुळे दोन सत्रात ही बैठक झाली.

खासदारांचे राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विषयावर मार्ग काढला जाईल. विभाग आणि विषयनिहाय खासदारांच्या समित्या स्थापन करून विविध बाबींचा पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील जनतेला खासदारांकडूनही अपेक्षा आहेत. राज्यातील जनतेचे प्रतिनिधित्व करताना त्या जनतेच्या हिताचे प्रश्न प्राधान्यक्रम ठरवून सोडवले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक खासदाराने केंद्र शासनाकडून राज्य शासनाला जास्तीत जास्त निधी मिळवून दिला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे कामकाज अधिक सुधारावे त्यासाठी खासदारांची समिती करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जनतेचे हित पाहताना ते तात्कालिक न पाहता दूरगामी परिणाम करणारे असावे असा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवून काम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईत आल्यावर खासदारांच्या निवासासाठी नविन मनोरा आमदार निवासमध्ये सध्या १० खोल्यांची सोय करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *