Breaking News

शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद, राम मंदीराचा निकाल ही शिवनेरीवरील मातीचा परिणाम ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी साधला नेत्यांशी संवाद

मुंबई: प्रतिनिधी
शिवनेरी किल्ल्यावरील शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. मात्र शिवनेरी किल्ल्यावरची माती घेवून मी अयोध्येला गेलो. तर वर्षभरात मंदीराचा निकाल लागला. राज्याचे मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे असून ही सगळी कमाल शिवनेरीवरील मातीची असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
याशिवाय विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही, तसेच प्राण जाये पर वचन न जाये हे ही आमची संस्कृती आहे. तरीही काहीजणांकडून आपल्याशी राजकारण करण्याचा प्रयत्न झाला असल्याने तो मोडित काढण्यासाठी मी मुख्यमंत्री पदावर बसल्याचे त्यांनी सांगत भाजपाला गर्भित इशारा दिला.
शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील शिवसेना भवनावर आयोजित छोटेखानी समारंभात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते.
शिवसेना हे स्वत:च वादळ असल्याने मला कोणत्याही वादळाची चिंता नाही. त्यामुळे वादळ येऊ चक्रीवादळ येऊ कोणतंही संकट येऊ तुमच्यासारखा शिवसैनिक माझ्यासोबत जोपर्यंत आहे मला कशाचीही भीती नाही. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचं कवच आहे. शिवसैनिकांचं कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुख सुद्धा लाचार होणार नसल्याची ग्वाही देत शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे. शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक. आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे.मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्या सोबत संपर्क जरी कमी झाला असला तरी मी अंतर कमी पडू देणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी उपस्थित सेना नेत्यांना त्यांनी यावेळी दिली.
कोरोना हे आपल्या देशावर आलेले विचित्र संकट आहे. शिवसेनेच्या शाखा या आता दवाखाने बनतील. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जसे की , मास्क, पी पी ई किट, हॅन्ड ग्लोज आदी गोष्टी पुरविण्यात येत असल्याचे सांगत कस्ततुरबा आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या, आता १०० लॅब निर्माण केल्या असून राज्यात आणखी लॅब वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशीच साथ सर्वांनी नेहमीच शिवसेनेसोबत द्या आणि सर्वांनी आपली काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *