Breaking News

राष्ट्रवादी- शिवसेना म्हणाली, दूषित वातावरण होतेय भाजपाने बोलू नये एनपीआर, सीएएच्या कायद्यावरून विधानसभेत रणकंदन

मुंबईः विशेष प्रतिनिधी

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या एनपीआर आणि सीएए कायद्यामुळे राज्यातील कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. मात्र याबाबतच्या अफवा राज्याच्या मंत्र्यांकडूनच पसरविल्या जात असल्याने याप्रश्नी गृह विभागाने लक्ष घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांना बोलू न देण्याची मागणी केल्याने विधानसभेत चांगलाच गदारोळ झाल्याने अखेर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाकडून राज्यातील वातावरण दूषित करण्यात येत असल्याचा आरोप करत भाजपाने बोलू नये अशी मागणी केली. त्यामुळे अखेर सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. विधानसभेत अर्थसंकल्पिय पुरवणी मागण्यांतील विभागवार चर्चेच्यावेळी ते बोलत होते.

कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्राने मंजूर केलेल्या सीएए कायदा हा नागरीक विरोधी नाही. तसेच या कायद्यामुळे राज्यातील कोणत्याच समाजाचे किंवा नागरीकांचे नागरीकत्व जाणार नसल्याचे सांगत राज्य मंत्रिमंडळातीलच काही मंत्री बाहेर जावून आदीवासी, भटक्या विमुक्तांचे नागरिकत्व जाणार असल्याच्या अफवा पसरवित असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत याप्रश्नी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी केली.

त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ उत्तर देत विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला विषय संपूर्णपणे स्वतंत्र आहे. त्याचा अर्थसंकल्पिय पुरवणी मागण्यांशी संबध नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावर फडणवीस म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांनी सांगितले. त्यामुळे या अफवांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या अफवांमुळे दंगली झाल्याचे सांगताच सांसदीय कामकाज मंत्री अनिल परब म्हणाले की, ज्या काही दंगली झाल्या त्या तुमच्या (भाजपाशासित) राज्यात झाल्यात. याप्रश्नांवर राज्यात एकही दंगल झालेली नाही. त्यामुळे राज्यातील चांगले असलेले वातावरण तुम्ही दुषित करू नका असे सांगत याविषयावर चर्चा होवू शकत नसल्याचे स्पष्ट केले. परब यांच्या वक्तव्याने भाजपाच्या सदस्यांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक म्हणाले की, या मुद्याच्या अनुषंगाने नागपूर येथील अधिवेशनात अध्यक्षांनी यापूर्वीच निर्णय दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा याच विषयावर चर्चा बोलता येणार नाही. तसेच हा विषय केंद्राशी संबधित आहे. मलिक यांच्या वक्तव्यांवरून भाजपाचे सदस्य गोंधळ घालत होते. त्यास प्रतित्तुर म्हणून सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

या गोंधळातच देवेंद्र फडणवीस यांनी मला या विषयावर बोलण्याचा अधिकार असून मी नियमानुसारच बोलत असल्याचे सांगितले. तसेच सुधीर मुनगंटीवार यांना नियम वाचून दाखविण्याची विनंती केली. तसेच सांसदीय मंत्र्यांना काही वावगं वाटत असेल तर त्यांनी हक्कभंग आणावा असे आव्हान दिले.

त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी नियम वाचून दाखवित विधिमंडळाच्या नियमावलीत स्पष्टपणे सांगितल्याचे सांगत करोना व्हायरस आल्यानंतर आणखी एक नवा व्हायरस आल्याचे सांगितले. त्यामुळे सत्ताधारी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आक्रमक होत दोन्हीबाजूकडील सदस्यांनी गोंधळास सुरुवात केली. त्यामुळे अखेर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जो खाली बसून बोलेल आणि गोंधळ घालेल त्याला बाहेर काढेन अशी सक्त तंबी दोन्हीबाजूच्या सदस्यांना दिल्याने काही काळ शांतता पसरली. त्यानंतर त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा बोलण्याची संधी दिली.

त्यावेळी मुनगंटीवार यांनी विधिमंडळातील चर्चेचे आणि अधिकाराच्या नियमांचे वाचन करत विरोधी पक्षनेते राष्ट्रहिताचे आणि राज्यहिताचे बोलत असल्याचे सांगत त्यांना अटकाव करता येणार नसल्याचे सांगत काही आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आदी नेत्यांबरोबर शिवसेनेचे रविंद्र वायकर, अनिल परब यांच्यासह सत्ताधारी बाकावरील अन्य सदस्य आक्रमक झाल्याने गोंधळ वाढला.

त्यावर विधानसभा अध्यक्षांनी मुनगंटीवारांचे आक्षेपार्ह वक्तव्य कामकाजातून काढून टाकत असल्याचे सांगत हा वाद इथेच संपविण्याचे आवाहन करत मुनगंटीवारांना पुन्हा बोलण्याची संधी दिली. त्यावर ते म्हणाले की, एनपीआर आणि सीएए कायद्याबाबत असलेले गैरसमज दूर व्हावे या अनुषशंगाने विरोधी पक्षनेते बोलले आहेत. त्यामुळे यावर अध्यक्षांनीच निर्णय द्यावा अशी मागणी केली.

त्यानंतर मंत्री नवाब मलिक म्हणाले की, याप्रश्नावर नागपूर येथील अधिवेशनातच निर्णय दिलेला आहे. तसेच या कायद्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. न्यायालयानेही याबाबत स्पष्टपणे बोलण्याचे टाळले आहे. असे असताना यावर चर्चा होवू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत वातावरण दुषित करणारा व्हायरस याच सभागृहात थांबला पाहिजे अशी मागणी केली. मलिक यांच्या भाषणातही भाजपाच्या सदस्यांकडून वारंवार वक्तव्य आणत त्यांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. तरीही त्यांनी त्यांचे भाषण पूर्ण केले. यानंतर मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, विधिमंडळ ३४ अन्वये देशातील कोणत्याही न्यायालयात एखादी बाब प्रलंबित असेल तर त्यावर विधिमंडळात चर्चा करता येत नसल्याचे सांगत भाजपा या नावाचा नवा उपरोधिक अर्थ सांगितला. त्यामुळे भाजपाचे सदस्य आणखीनच आक्रमक होत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावर सत्ताधारी बाकावरील सदस्यांनीही गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने अखेर विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर या गोंधळाचे कामकाज तपासून आक्षेपार्ह असलेले काढून टाकण्यात येईल असे सांगत पुढील कामकाज सुरु केले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, सहा हजार कोटी पंतप्रधान कार्यालयाकडून वसूल

साडे सहा हजार कोटी रुपये पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले आहेत. मी स्वतःचे काहीच बोलत नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *