Breaking News

उल्का-गणेश नव्या जोडीचा ‘ओढ’ १९ जानेवारीला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

मुंबई : प्रतिनिधी

‘झांसी की रानी’ या मालिकेत राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री उल्का गुप्ताची पावलं आता मराठी सिनेसृष्टीकडे वळली आहेत. पदार्पणातच मुख्य भूमिका साकारत उल्का रसिकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. आर. पी. प्रोडक्शन या संस्थेची निर्मिती असलेल्या ‘ओढ’ या आगामी मराठी चित्रपटात तिची जोडी गणेश तोवर या नवोदित अभिनेत्यासोबत जमली आहे. या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना एक नवी कोरी जोडी पाहायला मिळणार आहे.

राणी लक्ष्मीबाईंची भूमिका यशस्वीपणे साकारल्यानंतर उल्काने बऱ्याच मालिकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं आहे, पण गणेश तोवरसाठी ‘ओढ’ हा पहिला सिनेमा आहे. एस. आर. तोवर यांची निर्मिती आणि सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती असलेल्या ‘ओढ’चं दिग्दर्शन नागेश दरक यांनी केलं आहे. उल्काने आजवर केलेल्या कामाच्या बळावर ‘ओढ’मध्ये मुख्य भूमिका पटकावली असून, तिच्या जोडी नवा चेहरा असावा ही कथानकाची गरज असल्याने एक नवी जोडी सादर करीत असल्याचं दिग्दर्शक नागेश दर यांचं म्हणणं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना मैत्रीची अनोखी गोष्ट पाहायला मिळेल.

‘ओढ’मध्ये गणेशसोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत बोलताना उल्का म्हणाली की, गणेशचा जरी हा पहिलाच चित्रपट असला तरी त्याचं कँमेऱ्यासमोरील वागणं एखाद्या अनुभवी कलाकाराप्रमाणे असल्याने काम करताना कुठेही अडथळा आला नाही. पहिला सिनेमा असूनही त्याच्या मनावर कधी दडपण नव्हतं. सेटवर तो जितका सहजपणे वावरायचा तितकाच सहज कॅमेऱ्यापुढेही असायचा. त्यामुळे आमची छान केमिस्ट्री जुळल्याचंही उल्का म्हणाली. पहिल्यांदाच कॅमेरा फेस करताना उल्काने दिलेल्या टिप्सचा खूप फायदा झाल्याचं सांगत गणेश म्हणाला की, उल्काने आजतागायत छोट्या पडद्यावर खूप काम केलं आहे. त्या तुलनेत मी खूपच नवखा होतो. तरी तिने कधीही याची जाणिव होऊ दिली नाही. अभिनयातील बारकावे समजावून सांगत सहकार्य केल्याने तिच्यासोबत काम करणं सोपं झालं.

वरवर पाहता या चित्रपटात प्रेमकथा दडल्याचं वाटत असलं तरी हा सिनेमा मैत्रीची गोष्ट सांगणारा असून, या निमित्ताने प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. दिनेशसिंग ठाकूर यांनी या चित्रपटाची कथा व पटकथा लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखनही केलं आहे. छायांकन रविकांत रेड्डी यांनी केलं आहे. १९ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात उल्का आणि गणेशच्या जोडीला मोहन जोशी, भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ, मृणाल कुलकर्णी आदि मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार आहेत.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *