मुंबई : प्रतिनिधी
मराठी प्रेक्षकांना लवकरच आणखी एक नवी कोरी जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. छोट्या पडद्यावरील लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान आणि मराठी चित्रपटसृष्टी वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता उमेश कामत यांची प्रथमच जोडी जमली आहे. ‘असेही एकदा व्हावे’असंच काहीसं म्हणत उमेश आणि तेजश्री एकत्र आले आहेत. कारण या चित्रपटाचं शीर्षकच ‘असेही एकदा व्हावे’असं काहीसं वेगळं आहे.
आज चहूबाजूला मकरसंक्रांतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. उमेश आणि तेजश्री यांनी याच सणाचं औचित्य साधत ‘असेही एकदा व्हावे’या चित्रपटाची घोषणा केली. दोघांनीही नुकताच मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजराही केला. झेलू एंटरटेनमेन्टस निर्मिती असलेल्या ‘असेही एकदा व्हावे’ची अधिकृत घोषणा दादर येथील प्लाझा सिनेमागृहात नुकतीच करण्यात आली. दरम्यान या सिनेमाचा टीझर मोशन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आला.
मकर संक्रातीचं औचित्य साधत पार पडलेल्या या कार्यक्रमात उमेश आणि तेजश्रीने उपस्थितांना तिळगुळ देत सर्वांना शुभेच्छा दिल्या. शिवाय पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंददेखील लुटला. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती मधुकर रहाणे यांनी केली आहे. याकामी रहाणे यांना त्यांचे मित्र रविंद्र शिंगणे यांचे सहकार्य लाभले आहे. टीझर मोशन पोस्टरवरून हा एक रोमँटिक चित्रपट असल्याचा अंदाज येतो. या चित्रपटात अभिनेत्री शर्वाणी पिल्लईचीही महत्वाची भूमिका आहे. प्रेमाची नवी परिभाषा मांडणारा हा सिनेमा येत्या ६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.