Breaking News

“त्या” आमदारांना भाजपाच्या तावडीतून सोडवून आणणारी व्यक्ती राष्ट्रवादीची स्टार प्रचारक शरद पवारांसह हे २४ नेते स्टार प्रचारक

मराठी ई-बातम्या टीम

साधारणत: दोन वर्षापूर्वी राज्यातील पहाटेच्या सत्तांतराच्या नाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आमदार हरयाणातील गुडगांव येथील एका हॉटेलमध्ये भाजपाने लपवून ठेवले होते. त्यांच्यावर कडेकोट पहारा होता. परंतु तशाही कडेकोट पहाऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या आमदारांना हॉटेलमधून सोडवून आणणारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय विद्यार्थी सेलची अध्यक्षा सोनिया दुहन हीचा राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकाच्या यादीत समावेश केला आहे. सोनिया दुहन या आता गोवा विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात उतरणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रात्रीतून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करत राज्यात पहाटेचे सरकार स्थापन केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रसेचे १२ आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले होते. त्यातील नरहरी झिरवळ यांच्यासह चार जणांना हरयाणातील एका हॉटेलमध्ये भाजपाकडून ठेवण्यात आले होते. याची माहिती शरद पवारांना कळताच या आमदारांना त्या हॉटेलमधून परत आणण्याची जबाबदारी दिल्लीच्या रहिवाशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन यांच्यावर सोपविली. त्यानुसार त्यांनी सकाळी सकाळी त्या हॉटेलमध्ये जावून अंत्यत नाट्यमयरितीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या आमदारांना सुखरूपरित्या नवी दिल्लीत आणले. याची माहिती दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच दिल्यानंतर सोनिया दुहन यांचे नाव चर्चेत आले. आता त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत सोनिय दुहन यांचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादीत केली आहे.

गोवा विधानसभा निवडणूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसने २४ स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली कार्यालयातून जाहीर केली. गोवा विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युती असून यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, केरळचे वनमंत्री ए. के. ससिनद्रन, राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, खासदार फौजिया खान, युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, गोवा अध्यक्ष जोसे फिलीप डिसोजा, डॉ. प्रफुल हेडे, अविनाश भोसले, सतिश नारायणी (गोवा), केरळचे अध्यक्ष पी. सी. चोको, केरळचे आमदार थॉमस के. थॉमस, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींचा समावेश आहे.

या स्टार प्रचारकांची यादी दिल्ली कार्यालयातून पक्षाचे राष्ट्रीय सचिव व कार्यकारिणी सदस्य एस. आर. कोहली यांनी प्रसिद्धीला दिली आहे.

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *