Breaking News

लेकीचं आणि झाडाचं नातं झालं अधिक दृढ

कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत लागली २१ हजार ७७० झाडं

मुंबई: प्रतिनिधी

 शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात १० वृक्षांची लागवड करायची असा संस्कार वन विभागाने “कन्या वन समृद्धी योजने”अंतर्गत घालून दिला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या योजनेनं  शेतकऱ्यांच्या लेकीचं तिच्या नावाने लावल्या जाणाऱ्या झाडाशी असलेलं नातं अधिक दृढ केलं. योजनेअंतर्गत राज्यात २०१८ च्या पावसाळ्यात २ हजार १७७ मुलींच्या जन्मानंतर  २१ हजार ७७० रोपांची लागवड झाली आणि रोप लावून त्या मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याची एक अनोखी परंपरा राज्यात रुजली.

पुणे विभागाने यात आघाडी घेतली असून २०१८ च्या पावसाळ्यात ९७१ मुलींच्या जन्मानंतर तिथे सर्वाधिक ९ हजार ७१० रोपांचे वाटप करण्यात आले. त्या पाठोपाठ नागपूर चा नंबर लागतो येथे ६७४ मुलींच्या जन्मानंतर ६ हजार ७४० रोपांचे वितरण योजनेअंतर्गत करण्यात आले. अमरावतीमध्ये ४३८ मुलींच्या जन्मानंतर योजनेतून ४ हजार ३८० झाडं लागली. औरंगाबाद, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांनी योजनेतून शेतकऱ्याच्या घरी जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे झाडांचे वितरण केले आहे. असे असले तरी ज्या शेतकऱ्यांच्या घरी मुलगी जन्माला येते त्या शेतकरी कुटुंबाने पुढे येत या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याची आवश्यकता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

योजनेतून मिळतात ही १० झाडे…

वाढत्या जागतिक तापमानाचे धोके कमी करायचे असतील तर राज्यात वृक्षाच्छादन वाढावे, सध्याचे २० टक्क्यांचे हरित क्षेत्र राष्ट्रीय वननीतीनुसार ३३ टक्क्यांपर्यंत जावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वन विभाग काम करत आहे. कन्या वन समृद्धी योजनेचे बीज ही याच विचारातून रुजले आहे. योजनेमध्ये ज्या शेतकरी दाम्पत्याच्या घरी मुलगी जन्माला येईल त्यांना वन विभागाकडून पाच सागाची तर पाच फळझाडाची रोपे प्रोत्साहन म्हणून दिली जातात. ५ सागाच्या रोपांशिवाय दिल्या जाणाऱ्या फळझाडांच्या रोपांमध्ये २ रोपे आंब्याची, १ रोपं फणसाचं, १ रोपं जांभळाच तर एक रोपं चिंचेच आहे.  भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन वृक्षांची निवड करण्यात आली आहे.

विकसित होईल उत्पन्नाचा स्त्रोत

मुलीच्या जन्माबरोबर वृक्ष लावल्यास मुलगी जशी मोठी होईल तसे वृक्ष ही मोठे होत जातील. तिच्या लग्नापर्यंत हे वृक्ष मोठे झालेले असतील. फळांनी लगडलेले असतील. त्यातून पर्यायी उत्पन्नाचा स्त्रोत देखील विकसित होऊ शकेल. सागाच्या  वृक्षांपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून तिच्या विवाहाच्या वेळी आवश्यकता असणारी पैशांची निकड ही भागवता येऊ शकेल अशी प्रतिक्रिया वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.

असा घ्यायचा योजनेचा लाभ

शेतकरी कुटूंबात जन्‍म झालेल्‍या मुलीच्‍या पालकांनी मुलीचा जन्‍म झाल्‍यानंतर संबंधित ग्राम पंचायतीच्‍या ठिकाणी मुलीच्‍या नावाची नोंद करावयाची आहे. त्यानंतर  संबंधित ग्राम पंचायतीकडे विहीत नमुन्‍यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावयाचा आहे.

वृक्षलागवड मोहिमेत असंही जोडलं गेलं लेकीचं वृक्षांशी नातं…

वन विभागाने सुरुवातीला वृक्षलागवडीत लेकीचं नातं अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला तो “माहेरची झाडी” या उपक्रमातून. सासरी जाणाऱ्या लेकीची आठवण म्हणून तिच्या हाताने माहेरच्या अंगणात विविध फळझाडांचे वृक्ष लावण्याचा संस्कार महाराष्ट्रात रुजला. १३ कोटी वृक्षलागवडीत अनेक ठिकाणी सासरी जाणाऱ्या लेकीच्या नावे “माहेरची झाडी”लागली.  अंगणात  बहरणारं लेकीचं झाडं पाहून सासरीही आपली मुलगी अशीच आनंदी असल्याचे समाधान आई-वडिलांना मिळू लागलं…

सुरक्षित पर्यावरणासाठीही

राज्यातील जैवविविधता जपताना भावी पिढीसाठी सुरक्षित पर्यावरण हाती देण्याचा प्रयत्न यातून पूर्णत्वाला जाण्यास मदत होणार आहे. नव्याने उमलणाऱ्या पिढीत आपल्या नावे लागलेल्या वृक्षांप्रति आवड निर्माण झाल्याने वृक्ष जगण्याचे प्रमाण वाढेल, पर्यावरण रक्षण, वृक्षलागवड आणि वृक्ष संगोपनाची भावना त्यांच्यामध्ये वृद्धिंगत होईल, असा विश्वास यातून व्यक्त होत आहे. शिवाय यातून वनश्री तर वाढत आहेच पण शेतकऱ्यांची कन्याही खऱ्या अर्थाने “धनश्री” ठरत आहे ते वेगळं.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *