Breaking News

भाजप सरकारला जमिनीवर आणण्यासाठी सज्ज व्हा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेत छगन भुजबळ यांचे आवाहन

भिवंडी: प्रतिनिधी

हवेत असलेल्या या सरकारला जमिनीवर आणण्याचे काम तुम्हा- आम्हाला करायचे आहे त्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी करत विकासाचा मुद्दा बाजुला ठेवुन भाजप सरकार मंदिर मस्जिदीचा मुद्दा घेवून सरकार धंदा करत आहे. राम रहीम हे एक होते. परंतु या लोकांनी त्यांना बाजुला केल्याचा आरोपही छगन भुजबळ यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा भिवंडी येथे आल्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार पांडुरंग बरोरा, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,भिवंडी जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे आदींसह भिवंडी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मालमत्ता कर एक ते दीड लाखावर गेला. कसे उद्योगधंदे राहणार? आज आरोग्य धोक्यात आले आहे. १९९६ मध्ये २ लाख लोकसंख्या होती. त्यावेळी ११५ डॉक्टर होते. परंतु आज १८ लाखाच्यावर लोकसंख्या गेली आणि डॉक्टर फक्त ३६ आहेत. लोकांनी जगायचे कसे असा सवालही त्यांनी केला.

येणाऱ्या निवडणूका महत्वाच्या -अजित पवार

भाजपाने देश हुकुमशाही कडे न्यायला सुरुवात केली असून मागच्या दाराने आणीबाणी आणली आहे. अगदी असहिष्णूतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूका फार महत्त्वाच्या असल्याचे स्पष्ट मत विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार व्यक्त केले.

वाढत्या महागाईमुळे जगणं मुश्किल झाले आहे. ग्राहक आणि शेतकरी समाधानी नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांला आम्ही अडचणी येवू दिले नाही. त्यांना कर्जमाफी दिली, अडचणीला धावून गेलो. परंतु हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बेस्टचा संप का मिटवत नाही, मुंबईकरांचे हाल का करताय? नेतृत्वात ताकद असली पाहिजे, निर्णय घेण्याची धमक असली पाहिजे. अहो एक दिवस समजू शकतो सात दिवस झाले संपाला. परंतु अजुन निर्णय नाही हे काय चालले आहे ? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

बुलेट ट्रेन आणून हे सरकार मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम करत आहे असा आरोप करतानाच या बुलेट ट्रेनची काय आवश्यकता अशी विचारणा ही केली. बेरोजगारांना देण्यास नोकऱ्या नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफीला पैसे द्यायला पैसे नाहीत. परंतु बुलेट ट्रेनला द्यायला यांच्याकडे पैसे आहेत. आधी इथल्या समस्या सोडवा नको ती सोंगं करु नका अशा शब्दात अजितदादा यांनी सरकारला सज्जड दम भरला.

तिळगूळ घ्या गोड गोड बोला मोदींना हटवा. सेना भाजपाचे सरकार घालवा असे आवाहन करतानाच दादांनी जनतेला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. 

‘आम्ही नाही त्यातले’ अशी शिवसेनेची भूमिका -जयंतराव पाटील

भाजपसोबत ५० टक्के पापात सहभागी असलेली शिवसेना ‘आम्ही नाही त्यातले’ अशी भूमिका घेवून विरोधी पक्षाचे विचार मांडत असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केली.  

देश आणि राज्यातील भाजप सरकार बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा राज्यभर काढण्यात येत असून नरेंद्र आणि देवेंद्र यांनी कशी फसवणूक केली आहे याची माहिती जनतेपर्यंत पोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *